महाराष्ट्र

महिला अत्याचार अक्षम्य अपराध; कोलकाता, बदलापूर घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांचे प्रथमच भाष्य

केंद्र सरकार अत्याचार रोखण्यासाठी दक्ष असल्याचे सांगत अत्याचार करणाऱ्यांविरोधात सरकार कठोर कायदे करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जळगावला ‘लखपती दीदी’ संमेलनात बोलताना केली.

Swapnil S

जळगाव/विजय पाठक

महिलांवरील अत्याचार हा अक्षम्य अपराध आहे. तो करणाऱ्यांना मदत करू नका. सरकारे येतील आणि जातील, पण स्त्रीची सुरक्षा करणे हे आपले कर्तव्य आहे. पीडित महिला, मुली या घरातूनच ‘ई-एफआयआर’ दाखल करू शकतात. केंद्र सरकार अत्याचार रोखण्यासाठी दक्ष असल्याचे सांगत अत्याचार करणाऱ्यांविरोधात सरकार कठोर कायदे करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जळगावला ‘लखपती दीदी’ संमेलनात बोलताना केली.

जळगावला बचत गटाच्या ४८ लाख सदस्यांना २,५०० कोटींचे वितरण आणि २६ लाख बचत गट सदस्यांना ५००० कोटींचे बँक कर्ज ई-वितरण ‘लखपती दीदी’ संमेलनात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी देशातील विविध राज्यातील अकरा दीदींना लखपती झाल्याबद्दल पंतप्रधानांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

सोमवारी असलेल्या श्रीकृष्ण जयंतीच्या शुभेच्छा दीदींना देत पंतप्रधानांनी भाषणास सुरुवात केली. दोन लाखांवर उपस्थित महिलांना त्यांनी ‘मातांचा महासागर’ म्हणून संबोधित केले. पंतप्रधानांनी नुकताच केलेला परदेश दौरा आणि तेथे भेटलेले महाराष्ट्रीयन, तेथील त्यांना आलेले अनुभव विषद करताना पंतप्रधानांनी महाराष्ट्राचे कौतुक केले. तेथे तयार केलेल्या ‘कोल्हापूर मेमोरियल’चा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. महाराष्ट्राचा सेवाभाव उच्च आहे. येथील मातृशक्तीने देशाला प्रेरित केले आहे. असे सांगत राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख करत त्यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

आपणास ३ कोटी ‘लखपती दीदी’ करायचे असल्याचे सांगत महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक योजना आणल्या असून, त्याचा लाभ महिलांना झाला. आता ‘लखपती दीदी’ योजनेमुळे येणारी पिढीही मजबूत होईल. कारण एक महिला लखपती झाली की एका परिवाराचे भाग्य बदलते. असे सांगत त्यांनी, भारत तिसरी मोठी ताकद होत असून त्यात महिलांचा मोठा वाटा आहे, असे गौरवपूर्ण उद‌्गार काढले.

२०१४ पर्यंत ३५ हजार कोटींपेक्षा कमी बँक कर्ज दिले गेले, पण गेल्या दहा वर्षांत ९ लाख कोटी मदत केली गेली. ही मदत ३० पट असून यामुळे देशांची मजबुती वाढल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. जळगाव येथील भाविकांच्या बसला नेपाळ येथे झालेल्या दुर्घटनेबाबत पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केले.

नेपाळ दुर्घटनाग्रस्तांना ५ लाखांची मदत जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, या संमेलनाने महिलांच्या उपस्थितीचे सर्व रेकॉर्ड मोडले असून, अभूतपूर्व उपस्थितीबद्दल बहिणींचे आभार मानत असेच प्रेम असू द्या, अशी विनंती त्यांनी केली. नेपाळ दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना त्यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.

‘नार पार’ योजनेची लवकरच निविदा - फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील पाडळसे, वाघूर योजना यांना दिलेल्या निधीचा उल्लेख करत, ‘नार पार’ ही योजना लवकरच अंमलात येईल, लवकरच तिची निविदा निघेल, असे जाहीर केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येने आलेल्या महिलांना यावेळी सलाम केला.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र कठोर कायदे आणणार

नव्या भारतीय दंड न्यायसंहितेनुसार महिलांना आता घरबसल्या अत्याचाराविरोधात ‘एफआयआर’ दाखल करता येणार आहे. त्यामुळे गुन्ह्याची ‘एफआयआर’ लगेच नोंद होऊन कारवाईला वेग येणार. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार नवे कठोर कायदे आणणार आहे, अशी माहितीही मोदींनी दिली. स्वातंत्र्यानंतर जितके महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकारने काम केले आहे, जितके आतापर्यंत कोणत्याच पक्षाने केले नसेल, असे मोदी म्हणाले.

महिलांवर अत्याचार करणारे माफीला पात्र नाहीत

महिलांवर अत्याचार करणारे नराधम माफीला पात्र नाहीत. अशा घटनेतील आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे. मी प्रत्येक राजकीय पक्ष आणि राज्य सरकारला सांगू इच्छितो की, महिलांवर होणारे अत्याचार अक्षम्य आहेत. कोणीही दोषी असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. कोणीही आरोपीला पाठीशी घालण्याचे प्रयत्न करू नयेत. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणात दोषीला शिक्षा देण्यासाठी राज्य सरकारसोबत केंद्र सरकार सुद्धा दोषीला शिक्षा देण्यासाठी खांद्याला खांदा लावून उभे असेल.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी