नागपूर : मला सगळ्यांचा प्रचंड आदर आहे. मी पोलीस सेवेचा अधिकारी असून माझी पूर्ण कटिबद्धता संविधानाशी आणि त्याच्या मूल्यांशी आहे. नागपुरात दीक्षाभूमी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार माझे मार्गदर्शक आहेत. विविध संघटन, संस्था यांच्या कार्यक्रमामध्ये जाणे आणि तिथे उपस्थित लोकांना भेटणे स्वाभाविक आहे, असे नांगरे पाटील यांनी म्हटले.
कार्यक्रमातील भाषणाबद्दल जे आक्षेप घेतले जात आहेत, तो १९ एप्रिलचा कार्यक्रम आहे. त्यासाठी सानपाडा येथील कार्यकर्ते निमंत्रण घेऊन आले होते. त्यामध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिक होते. जीएसटी संदर्भात मार्गदर्शन तिथे झाले, आध्यात्मिक मार्गदर्शन ही त्या ठिकाणी काही तज्ज्ञांनी केले. मी गेली ३० वर्ष पोलीस सेवेत आहे. मी रमजान ईदला जातो, जैन, शीख धर्माच्या कार्यक्रमात जातो, त्याच अनुषंगाने मी तिथेही गेलो होतो, असे स्पष्टीकरण नांगरे पाटील यांनी दिले. आम्ही इफ्तार पार्टीलाही जातो, त्याच मालिकेत मी याही कार्यक्रमात गेलो.
मी सेवा-शर्तीचे उल्लंघन केले नाही
त्या भाषणामध्ये मी ज्ञानेश्वरीतील प्रार्थनाही बोलून दाखवली अमली पदार्थांच्या तरुणाईला होणाऱ्या हानीबद्दलदेखील बोललो. त्याशिवाय पोलीस दलातील संधी बद्दल बोललो, त्यामुळे त्या (संघाच्या) कार्यक्रमात जाऊन कुठेही मी माझ्या नोकरीच्या सेवा- शर्तीचे उल्लंघन केलेले नाही, असेही ते म्हणाले. तो कार्यक्रम वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे आणि आरएसएसला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल होते. त्यामुळे मी कुठल्याही नियमाचे उल्लंघन केले, असे वाटत नाही, असे विश्वास नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले.
ही मोठी जबाबदारी
मी नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी कार्यभार स्वीकारला आहे. ऑरेंज सिटी आणि टायगर कॅपिटलमध्ये पहिल्यांदाच काम करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जो विश्वास दाखवला आहे, ते पाहता ही मोठी जबाबदारी आहे. कायदा-सुव्यवस्था राखणे, कोर पोलिसिंग करणे, महिला आणि लहान मुलांना सुरक्षित ठेवणे हे माझे प्राधान्य राहील, असे ते म्हणाले.