ठराविक दुकानातून पुस्तक खरेदीला चाप; शाळांवर कठोर कारवाईचा इशारा 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

ठराविक दुकानातून पुस्तक खरेदीला चाप; शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांतूनच पुस्तके, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसेच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.

Swapnil S

मुंबई : विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांतूनच पुस्तके, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसेच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.

राज्यातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याबाबत विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सदस्य भाई जगताप, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, बच्चू कडू यांनी सहभाग घेतला.

या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहायक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईने देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल.

लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नमूद केले. शाळांकडून पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याने शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी विनंती बच्चू कडू यांनी केली. 

राज्यमंत्री आणि दरेकर यांच्यात जुंपली

सदस्य प्रवीण दरेकर यांनी शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी भोयर यांनी याबाबत सदस्यांकडे तक्रारी असल्यास त्या शिक्षण विभागाकडे द्याव्यात, अशी सूचना केली. यावर दरेकर यांनी मग अधिकारी करतात काय असा सवाल केला. सदस्यांकडेच तक्रारी मागण्याचा मंत्र्यांचा हा प्रकार चुकीचा पायंडा पडणारे असल्याचे दरेकर म्हणाले. यावरून राज्यमंत्री आणि दरेकर यांच्यात चांगलीच जुंपली. याच दरम्यान शाळांवर फौजदारी कारवाई करण्यावरून राज्यमंत्री भोयर आणि बच्चू कडू यांच्यामध्येही शाब्दिक चकमक उडाली. 

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

लंडनमध्ये होणार ‘वैश्विक मराठी भाषा केंद्र’; मुंबईतील मराठी भाषा भवन २०२७ पर्यंत, उदय सामंत यांची माहिती 

NEET UG 2026 Re-Exam : २.७९ लाख विद्यार्थ्यांची ‘नीट’ फेरपरीक्षेला ‘दांडी’

Mumbai Rains : मुंबापुरीत संततधार; रस्ते झाले ओढे

Mumbai : ४ हजारांहून अधिक उघड्या मॅनहोलचा धोका

Mumbai : उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन