महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांचा पीएफ गेला कुठे? विरोधकांचा विधान परिषदेत सवाल; निधी कुठेही गेलेला नाही - परिवहन मंत्री

राज्य परिवहन महामंडळाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेला भविष्य निर्वाह निधी गेला कुठे, असा प्रश्न विरोधकांनी विधान परिषदेत उपस्थित केला.

Swapnil S

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेला भविष्य निर्वाह निधी गेला कुठे, असा प्रश्न विरोधकांनी विधान परिषदेत उपस्थित केला. निधी लंपास करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र भविष्य निर्वाह निधी कुठेही गेलेला नसून पीएफवर मिळणारे व्याज ही सुरक्षित आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. तसेच पीएफचा निधी मिळत नसल्याची तक्रार आली नसल्याचे सरनाईक यांनी सांगितले. परिवहन मंत्र्यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करत विरोधकांनी सभात्याग केला.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळात जमी केली नसल्याचा तारांकीत प्रश्न आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत मांडला.

परिवहन मंत्री सरनाईक यांनी एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची आणि ग्रॅच्युइटीची रक्कम अदा करणे बाकी असल्याची माहिती सभागृहात दिली. शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार शशिकांत शिंदे, कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी सरनाईक यांना घेरले. सरनाईक यांनी, मध्यंतरी एसटी कामगारांनी संप पुकारला होता, मात्र त्यानंतरही आम्ही कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली. परंतु आमच्याकडे भविष्य निर्वाह निधीसंदर्भात एकही तक्रार आलेली नाही. तसेच भविष्यात अशा प्रकारे कुठल्याही निधीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च केली जाणार नाही, अशी ग्वाही दिली.

परब यावर आक्षेप घेतला. कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे कुठेही वापरता येत नाहीत. जर वापरले गेले असतील तर फौजदारी गुन्हा ठरतो. त्यामुळे पीएफचे पैसे इतरत्र किंवा पगारावर वापरले असतील, संबंधितांवर ताबडतोब गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी केली. सरनाईक यावर खुलासा करत मागणी खोडून काढली.

पीएफवरील व्याज जमाच - सरनाईक

महामंडळाची ६४ कोटींची मासिक तूट आहे. तर शासनाकडून ५८२ कोटी तर मानव विकास योजनेचे २६८ कोटी येणे बाकी आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाली असली तरी कर्मचाऱ्यांच्या पीएफवरील व्याजाच्या रक्कमेचे नुकसान झालेले नाही. उलट त्यांचे व्याज जमा केले जात आहे, असा दावा सरनाईक यांनी परिषदेत केला. परब यांनी यावरून सरनाईक यांना लक्ष्य केले. कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारणे गुन्हा आहे. गुन्ह्यात परिवहन मंडळाच्या अध्यक्षांना सहआरोपी केले जाते. त्यामुळे सहआरोपी आहात का, असा प्रश्नांची सरबत्ती केली.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन