देवेंद्र फडणवीस,मनोज जरांगे पाटील (डावीकडून) 
महाराष्ट्र

...तर मुंबईत येणार; मुख्यमंत्र्यांना इशारा, मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित

आमच्या लेकराला नख लागू देऊ नका. जर तरुण बिथरले तर आमदार, खासदारांना हाणतील, मराठ्यांनी एकदा निर्णय घेतला तर माघार घेणार नाही, असा इशारा देत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले.

Swapnil S

जालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी १०० टक्के गद्दारी करणार नाहीत, ते आमच्या मागण्या मान्य करतील अशी आशा आहे, मात्र मागण्या मान्य केल्या नाहीत तर लवकरच मुंबईला येण्याची तारीख आम्ही जाहीर करू, यावेळी मुंबई जाम होऊ शकते, मराठे माघारी येऊ शकत नाहीत. आमच्या लेकराला नख लागू देऊ नका. जर तरुण बिथरले तर आमदार, खासदारांना हाणतील, मराठ्यांनी एकदा निर्णय घेतला तर माघार घेणार नाही, असा इशारा देत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले.

जरांगे म्हणाले की, पावणेदोन वर्षे मी सहन केले. आपण उपोषण स्थगित करतोय. आता शक्यतो उपोषण होणार नाही. समोरासमोर लढायचे. मी फडणवीसांकडे उत्तर मागितले होते, पण त्यांनी काही दिले नाही. जवळपास ८ मागण्या केल्या आहेत त्या पूर्ण करणार की नाही, मी देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकही शब्द बोललो नाही. तुम्ही जर मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी केली नाही तर मी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. तुम्ही माझ्या समाजाच्या मागण्या पूर्ण करा, समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. गोरगरीब मराठ्यांना सांभाळा, जर मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही तर मुंबईला येण्याची तारीख घोषित करेन, असे त्यांनी स्पष्ट केले.

कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीला मुदतवाढ दिली नाही. वंशावळ समिती बरखास्त केली. आपल्या मुळावर कुठे कुठे घाव घातला हे माहिती असणे गरजेचे आहे. सरसकट गुन्हे मागे घेऊ बोलले तेही घेतले नाहीत. सातारा, हैदराबाद गॅझेट लागू केले नाही. परंतु शिंदे समिती आम्ही ताबडतोब सुरू करतो, असा २-३ दिवसांपासून निरोप आहे. एखाद्या गोरगरीब समाजाला किती घुमवायचे याला मर्यादा असतात. गुन्हे मागे घेतो असे सातत्याने सांगण्यात येत आहे, असे जरांगे म्हणाले.

मंत्री, आमदारांना हाणायचे...

आर्थिकदृष्ट्या मागास माध्यमातून ज्या पोरांनी प्रवेश घेतलेत ते तसेच ठेवा, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या काही कुटुंबांना १० लाख रुपये मिळाले नाहीत. काहींना पैसे दिलेत, काहींना दिले नाहीत. सगेसोयरे अंमलबजावणी झालीच पाहिजे. त्यात जे आक्षेप आलेत त्याची छाननी करून २-३ महिन्यांत सगेसोयरे अंमलबजावणी केली पाहिजे. आता मुंबईला गेलो तर माघारी फिरणार नाही. मराठ्यांना ओबीसीत आरक्षण पाहिजे असेल तर २०१२ चा कायदा दुरुस्त करावा लागेल. आता मुंबईला गेल्यावर अंमलबजावणी केल्यावरच माघारी येऊ. सगेसोयरे अंमलबजावणी लहान विषय नाही. यावेळी मुंबईला जाताना अडवले तर मंत्री, आमदारांना हाणायचे. मुंबईला नियोजनबद्ध जायचे, असे जरांगे यांनी म्हटले आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन