मुंबई

ठाकरे गटाने नोंदविलेली १२ हजार नावे पुरवणी यादीतून गायब; अनिल परब यांचा आरोप

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नोंदवलेली १२ हजार नावे कोणत्याही कारणाशिवाय निवडणूक आयोगाने पुरवणी मतदार यादीतून वगळल्याचा आरोप या मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गट तथा महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल परब यांनी केला. तसेच निवडणूक आयोगाने ही नावे जाणूनबुजून सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली वगळल्याचा आरोपही त्यांनी केला.

यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने खासदार अनिल देसाई नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाला एक निवेदन दिले. देसाई यांच्यासोबत परब आणि आमदार विलास पोतनीस उपस्थित होते. परब म्हणाले की, पुरवणी मतदार यादीत शिवसेनेने जी नावे नोंदवली होती त्यातील बरीचशी नावे आलेली नाहीत. त्यांनी फॉर्म स्वीकारल्याच्या पोचपावत्या आमच्याकडे आहेत. ज्यावेळेस फॉर्म दिला जातो त्यावेळेस तो तपासूनच त्याची पोचपावती दिली जाते. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर पोचपावती येते. ज्यावेळेस पोचपावती दिली जात नाही त्यावेळेस तो फॉर्म नाकारला जातो आणि त्याची कारणे दिली जातात. फॉर्म नाकारण्याची कारणे समजणे हा अधिकार आहे. मात्र यावेळेस फॉर्म स्वीकारूनही नावे आलेली नाहीत आणि त्याची कोणतीही कारणे आम्हाला दिलेली नाहीत. त्यामुळे यात मोठी गडबड आहे, असे त्यांनी सांगितले.

ही नावे निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली वगळल्याचाही आरोप परब यांनी केला. आम्ही नोंदवलेली नावे आली नसली तरी सत्ताधारी पक्षाने जी नावे दिलेली आहेत ती मात्र सर्वच्या सर्व पुरवणी मतदार यादीत आलेली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग हे जाणूनबुजून सत्ताधारी पक्षाच्या निर्देशाखाली काम करत आहे असे वातावरण तयार झाले आहे, असा आरोप परब यांनी केला.

पदवीधर निवडणुकीकरिता मतदान केंद्राची निश्चिती करताना राजकीय पक्षांना विश्वासात न घेताच थेट अंतिम मतदान केंद्रांची यादी देण्यात आली. एकाच घरातील पतीस पश्चिमेकडील केंद्र, तर पत्नीस पूर्वकडील मतदान केंद्र असा अक्षम्य घोळ घालण्यात आला असल्याचे परब म्हणाले.

तसेच गैरसोयीची आणि मुसळधार पावसात पाणी भरणाऱ्या ठिकाणी मतदान केंद्रे ठेवली असून त्यामुळे मतदानाच्या दिवशी गोंधळ होण्याची शक्यता आहे. याबाबत पक्षाचे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार विलास पोतनीस यांनी आपणाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे अशी मतदान केंद्रे बदलून द्यावीत, अशी मागणी आहे.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था