मुंबई : चौदा हजार गुंतवणूकदारांना तब्बल १४२ कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या टोरेस घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आठ जणांविरोधात २७ हजार १४७ पानी आरोपपत्र सत्र न्यायालयात दाखल केले आहे.
या आरोपपत्रात प्लॅटिनियम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसह संचालक सर्वेश अशोक, महाव्यवस्थापक तानिया कासाटोवा, वेलेंटाइन गणेश कुमार, अल्पेश खारा, तौफिक रियाझ, अरमान अतियन, लल्लन सिंग या आरोपींवर आरोप ठेवण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील काही आरोपी परदेशात पळून गेल्याने त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्या आरोपींच्या अटकेनंतर पुरवणी आरोपपत्र सादर करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
टोरेस कंपनीने मोजोनाईट नावाचा खडा विक्रीस ठेवला होता. तो खरेदी केल्यावर त्या रकमेवर दर आठवड्याला सहा टक्के व्याजदर देण्याचे आश्वासन दिले होते. याचप्रकारे इतरही अनेक योजना सादर करून कंपनीने शेकडो गुंतवणूकदारांना आकर्षित करून घेतले. या गुंतवणूकदारांनी इतर गुंतवणूकदारांना गुंतवणुकीस प्रवृत्त केल्यास त्यांनाही भरघोस कमिशन देण्याचे जाहीर केल्याने कंपनीकडे गुंतवणूकदारांचा ओघ वाढत गेला होता. दादर येथील कंपनीच्या कार्यालयात एक लाखाहून अधिक गुंतवणूकदारांनी आपली रक्कम गुंतवली. १४० कोटींहून अधिक रक्कम जमा होताच कंपनीने गाशा गुंडाळला होता. त्यानंतर पोलिसांनी काही ठिकाणी छापे घालून सुमारे ३५ कोटींचा मुद्देमाल जप्त केला.