मुंबई : खड्डेमुक्त मुंबईसाठी मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीट करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. सिमेंट काँक्रीटीकरण टप्पा १ अंतर्गत निर्धारित उद्दिष्टांपैकी ७७ टक्के कामे पूर्ण झाली आहेत, तर टप्पा २ अंतर्गत ५२ टक्के कामे पूर्णत्वास गेली असून एकूण मिळून ६३ टक्के कामे यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहेत. पुढील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण कामे करताना रस्तेनिहाय सूक्ष्म नियोजन करावे. हाती घेतलेला रस्ता, खोदण्यात आलेला रस्ता निश्चित केलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावा, असे स्पष्ट निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. काँक्रीटीकरण कामे करताना लोकप्रतिनिधींसमवेत संवाद साधावा, त्यांना इत्यंभूत माहिती द्यावी, त्यांचा प्रतिसाद मिळवावा, असे निर्देश गगराणी यांनी दिले आहेत.
मुंबईच्या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वाकांक्षी सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत शहर आणि उपनगर भागात काँक्रीटीकरण कामे सुरू आहेत. या कामांचा महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, उप आयुक्त गिरीश निकम, प्रमुख अभियंता मंतय्या स्वामी यांच्यासह संबंधित अभियंते उपस्थित होते.
रस्ते काँक्रीटीकरण प्रकल्पामुळे रस्ते प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि जलद होणार आहे. काँक्रीट रस्त्यावर पावसामुळे खड्डे होण्याचे प्रमाण अत्यल्प राहते, परिणामी देखभाल आणि परिरक्षणाचा खर्चही मोठ्या प्रमाणावर वाचतो. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला आधुनिक, सुरक्षित आणि सुयोग्य स्वरूप देण्याच्या दृष्टीने रस्ते काँक्रीटीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत १० फेब्रुवारी अखेर एकूण १५९४ रस्त्यांचे मिळून ४३०.६९ किलोमीटर लांबीचे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. टप्पा १ अंतर्गत निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ७७ टक्के तर, टप्पा २ अंतर्गत निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ५२ टक्के लक्ष्यपूर्ती करण्यात आली आहे. म्हणजेच टप्पा १ आणि टप्पा २ असे एकत्रित मिळून पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी ६३ इतकी आहे, असे गगराणी यांनी सांगितले.
रस्ते कामात अभियंत्यांची प्रत्यक्ष हजेरी अनिवार्य
काँक्रीटी रस्त्यांची अंमलबजावणी सुरू असताना अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. कामे सुरू करताना कामाच्या गुणवत्तेत विशेष लक्ष द्यावे, गुणवत्तापूर्ण काम करणे म्हणजे केवळ रस्त्याचा पृष्ठभाग चांगला असणे नव्हे तर, त्याच्या बेस लेवलपासून प्रत्येक स्तरावर मानकाप्रमाणे सर्व घटकस्तर व त्याच्याशी संबंधित आर्द्रता, तापमान इत्यादीसह तांत्रिक निकष तंतोतंत पाळले जाणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अभिजित बांगर यांनी सांगितले.
पावसाळ्यापूर्वी महत्त्वाचा टप्प्पा गाठा
भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे काँक्रीटीकरण कामे अधिक गुणवत्तापूर्ण होत आहेत, असा प्रतिसाद सहायक अभियंत्यांनी दिला आहे. विद्यमान सत्र संपण्यापूर्वी ९० दिवसांचा कालावधी हातामध्ये आहे. या ९० दिवसांचे सूक्ष्म नियोजन केले तर पावसाळ्यापूर्वी काँक्रीटीकरण प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्प्पा गाठता येऊ शकतो, असे बांगर यांनी नमूद केले.