मुंबईत ८ हजार उघड्या मॅनहोलचा धोका कायम; साकीनाक्यातील दुर्घटनेनंतरही संरक्षक जाळ्या बसवण्याकडे दुर्लक्ष 
मुंबई

मुंबईत ८ हजार उघड्या मॅनहोलचा धोका कायम; साकीनाक्यातील दुर्घटनेनंतरही संरक्षक जाळ्या बसवण्याकडे दुर्लक्ष

मुंबईतील सर्व मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी बंदिस्त करा, असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी २ जुलै रोजी दिले होते. मात्र आजही किमान ८ हजार मॅनहोल हे संरक्षक जाळ्यांविना असल्याची माहिती पालिकेने दिलेल्या आकडेवारीतून पुढे आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील सर्व मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी बंदिस्त करा, असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी २ जुलै रोजी दिले होते. मात्र आजही किमान ८ हजार मॅनहोल हे संरक्षक जाळ्यांविना असल्याची माहिती पालिकेने दिलेल्या आकडेवारीतून पुढे आली आहे. मुंबई महापालिकेच्या मलनिस्सारण व पर्जन्य जलवाहिनी विभागाचे असे एकूण १ लाख ३ हजार ९२६ मॅनहोल आहेत.

यापूर्वी ऑगस्ट २०१७ मध्ये परळ येथील एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. दीपक अमरापूरकर यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर प्रत्येक पावसाळ्यात मुंबईतील मॅनहोलचा प्रश्न चर्चेत येतो. साकीनाका येथील खैराणी रोडवरील उघड्या मॅनहोल मध्ये पडून अस्लम शेख (५५ ) यांचा नुकताच मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मॅनहोल दुघटनेचा अहवाल गुलदस्त्यात!

साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख (५५) यांचा २ जुलै रोजी मृत्यू झाला. या घटनेला महिना उलटला, आता तरी चौकशी अहवाल जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी पालिका आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे. साकीनाका येथे उघड्या मॅनहोल मध्येपडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाला. ही नैसर्गिक आपत्ती नसून प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर अधिकाऱ्यांचे निलंबन, संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणे आणि चौकशीची घोषणा करण्यात आली होती. मात्र जवळपास एक महिना उलटूनही चौकशी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. या प्रकरणात दोषी कोण, त्यांच्यावर कोणती कारवाई झाली, फौजदारी गुन्हे दाखल झाले का आणि पीडित कुटुंबाला न्याय व योग्य नुकसानभरपाई मिळाली का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

पुढील आठवड्यात अहवाल सादर होणार

साकीनाका येथे २ जुलै रोजी उघड्या मॅनहोल मध्ये पडून अस्लम शेख (५५) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली २ जुलै रोजी तीनजणांची उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र महिना उलटत आला असून पुढील आठवड्यात अहवाल सादर करण्यात येईल, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

महापौरांच्या संकल्पनेतील ‘मॅनहोल रेलगार्ड’चा वापर

मुंबईतील मॅनहोल्सवर कामे करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल व दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती विकसित करण्यात आली आहे. ही प्रतिकृती प्रायोगिक तत्त्वावर मुंबईतील ‘एल’ प्रशासकीय विभागामध्ये वापरात आणली असून याठिकाणी प्रयोग यशस्वी झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी मॅनहोलच्या कामादरम्यान रेलगार्डचा वापर करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

साकीनाका येथील दुर्घटनेनंतरही प्रश्न कायम

मुंबईतील १ लाख ३ हजार ९२६ मॅनहोल्स पैकी ९६ हजार ३९३ मॅनहोल हे संरक्षक जाळ्यांनी बंदिस्त करण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र आजही ८ हजार मॅनहोल हे संरक्षक जाळ्यांनी बंदिस्त नसल्याची माहिती पालिकेच्या आकडेवारीतून समोर आली आहे. दरवर्षी पावसाळ्याआधी ३१ मे पूर्वी उघड्या मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवा, असे आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात येतात. यंदाही उघडी मॅनहोल बंदिस्त करण्याचे आदेश पालिकेच्या २६ विभागीय सहाय्यक आयुक्तांसह संबंधित यंत्रणांना पालिका प्रशासनाने दिले होते. मात्र साकीनाका येथे उघड्या मॅनहोल मध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाला आणि मुंबईतील उघड्या मॅनहोलचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला. मुंबईत आजही ८ हजार उघड्या मॅनहोलचा धोका असल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यात अनेक भागांत जोरधार; नदी, नाले, धरणे ओव्हर फ्लो; हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा

हॉटेलची बदनामी थांबवा! हॉटेल व्यावसायिक संघटनेचे FDA ला आवाहन

मंत्रालय कॅन्टिनमध्ये खराब भाज्या, फ्रीजही बंद; न्यायालयाच्या आदेशानंतर मंत्रालय, विधानभवनातील कॅन्टिनची तपासणी

तुम्ही भूतकाळ, भविष्याशी खेळू नका - राहुल गांधी

भाजपच्याच गुंडांनी केली पोलिसांवर दगडफेक; अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप