मुंबई

टोमॅटो खाल्याने २७ वर्षांच्या महिलेचा मृत्यू

मृत महिला मालाड येथील मालवणीतील खारोडी गाव, कम्पाउंड पास्कलवाडीत राहत होती

प्रतिनिधी

मालाड येथे केमिकलमिश्रीत टोमॅटो खाल्याने एका २७ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून महिलेच्या नातेवाईकांची जबानी नोंदवून घेतली आहे. या मृत्यूमागे घातपात नाही, तसेच त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत महिला मालाड येथील मालवणीतील खारोडी गाव, कम्पाउंड पास्कलवाडीत राहत होती. घरात उंदीर झाल्याने तिने पिंजरा आणला होता; मात्र पिंजरा लावूनही उंदिराकडून तिच्या घरातील सामानाचे नुकसान सुरू होते. त्यामुळे तिने बाजारातून उंदीर मारण्याचे एक केमिकल आणले होते. ते केमिकल तिने घरातील काही टोमॉटोवर लावले होते. टीव्ही पाहण्यात मग्न असताना तिने एक टोमॅटो मॅगीत टाकून ती मॅगी खाल्ली होती. काही वेळानंतर तिला उलट्या आणि जुलाब होऊ लागले. प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून तिला कूपर रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथेच तिच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान गुरुवारी रात्री तिचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तिच्या नातेवाईकांची जबानी घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या नातेवाईकांनी तिच्या मृत्यूबाबत कोणावर संशय अथवा तक्रार केली नाही. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक