मुंबई

माजी आमदार विद्या चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि माजी आमदार विद्या चव्हाण यांच्याविरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मोहित कंबोज यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अमित शहा यांचे जन्मस्थान व भाषेवरून चव्हाण यांनी टीका केली होती.

भाजपनेते मोहित कंबोज हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांना लक्ष्य करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप करत कंबोज यांनी राजकीय खळबळ उडवून दिली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात रान उठवण्यास सुरुवात केली आहे. अशातच एका मराठी वृत्तवाहिनीवरील चर्चेत बोलताना विद्या चव्हाण यांनी कंबोज यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांवर हल्ला चढवला.

या पार्श्वभूमीवर आता मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात विद्या चव्हाण यांच्याविरोधात आयपीसी कलम ५०५/२, ३७/१, १३५, ५०० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर विद्या चव्हाण यांनी मोहित कंबोज आणि भाजपवर टीका केली. “कंबोज हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. मोहित कंबोज आता आमच्याविरोधात आरोप करणार का? कंबोज याला कोणी अधिकार दिले? कोण आहे तो?” असे सवाल विद्या चव्हाण यांनी उपस्थित केले.

कंबोज यांनी दोन दिवसांपूर्वीच चव्हाण यांना टॅग करत ‘जय श्रीराम’ असे ट्विट केले होते; मात्र यातून अर्थबोध होत नव्हता; मात्र सोमवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर कंबोज यांच्या ट्विटचे खरे कारण समोर आले.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम