मुंबई : आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी भाजपवर टीका केली. भाजपने आपली विचारसरणी बदलली आहे. रक्त व क्रिकेट एकत्र कसे चालू शकते, असा सवाल उपस्थित केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, पाकिस्तानने भारतात अनेक वेळा दहशतवादी हल्ले केले आहेत. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामना दाखवण्यावर बहिष्कार घालावा. पाकिस्तानसोबत सामना खेळायला बीसीसीआयला इतकी उत्सुकता का? असा सवाल आदित्य यांनी उपस्थित केला.
खरी भाजप सत्तेत असती, तर असा सामना होऊ दिला नसता. आजच्या भाजपने त्यांची मूळ विचारसरणी सोडली आहे, असेही ठाकरे म्हणाले. जर रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, तर क्रिकेट आणि रक्त एकत्र कसे वाहू शकते, असे आदित्य यांनी म्हटले आहे.
शेलारांचे प्रत्युत्तर
आदित्य ठाकरे यांच्या टीकेला मंत्री आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शेलार म्हणाले की, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवर द्विपक्षीय राजकीय मतभेदांचे बंधन लागू पडू शकत नाही. आपली भूमिका नेहमीच स्पष्ट आहे. भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौरा करणार नाही, आणि पाकिस्तानही भारतात येणार नाही.