मुंबई

आजपासून आरे ते वरळी प्रवास सुरू; ‘मेट्रो-३’ ऑगस्टमध्ये कफ परेडपर्यंत

कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या ‘मेट्रो-३’ मार्गिकेच्या बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानच्या ‘२ अ’ टप्प्याचा शुभारंभ शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

Swapnil S

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या ‘मेट्रो-३’ मार्गिकेच्या बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानच्या ‘२ अ’ टप्प्याचा शुभारंभ शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या मार्गावर शनिवारी सकाळपासून मेट्रो धावणार आहे. तर आचार्य अत्रे चौक ते कुलाबा या मार्गावरील अंतिम टप्प्याच्या उद‌्घाटनासाठी येत्या ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बीकेसी स्थानकातून हिरवी झेंडा दाखवून मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ केला. त्यांनी यावेळी बीकेसी ते सिद्धीविनायक मेट्रो स्थानकादरम्यान प्रवासही केला. मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे’ या मेट्रो ३ च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी या १३ कि.मी. मार्गाचे लोकार्पण ७ ऑक्टोबर २०२४ रोजी झाले. आता ‘२अ’ - बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्ग हा दुसरा टप्पा उद्यापासून नागरिकांसाठी खुला होत आहे. येत्या ऑगस्टमध्ये मेट्रो ३ च्या अंतिम टप्प्याच्या मार्गावरील मेट्रो सेवा सुरू होईल. ‘मेट्रो-३’ मुंबईतील विमानतळांशी जोडली जाणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोची कामे मोठ्या वेगाने सुरू आहेत. याद्वारे मुंबईकर तसेच महामुंबईतील नागरिकांसाठी सुलभ व अखंड परिवहन जोडणी (सिमलेस ट्रान्स्पोर्ट सिस्टीम) यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू आहे. यावर्षी ५० कि.मी. तर पुढील वर्षी आणखी ५० कि.मी. मेट्रोचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे, असेही त्यांनी सांगितले.

मेट्रो प्रकल्पांमुळे मुंबईकरांना दिलासा - एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मेट्रोमुळे मुंबईतील लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधन व वेळेची बचत होणार आहे. मेट्रोची कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरील ५० टक्के वाहने कमी होतील. त्यामुळे महामुंबईकरांसाठी मेट्रो प्रकल्प वरदान ठरणार आहे, असे ते म्हणाले.

१३ लाख प्रवाशांना सेवा देणारा मार्ग
‘मेट्रो-३’ प्रकल्प पूर्ण झाल्यावर सुमारे १३ लाख प्रवासी या मार्गावरून प्रवास करतील. प्रत्येक ट्रेनला ८ कोच असतील. त्यामधून सुमारे २४०० प्रवासी प्रवास करू शकतील.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस