मुंबई : कर्तव्य बजावणाऱ्या महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवर धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवार विरोधकांच्या रडारवर आले आहेत. चोहोबाजूंनी टीकेची झोड उठल्यामुळे अखेर अजितदादांनी, 'माझा अंमलबजावणीत कायद्याच्या हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता', अशी सारवासारव केली आहे.
राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यापासून महायुतीचे आमदार, मंत्री वारंवार वादग्रस्त विधाने करीत आहेत. यामुळे महायुतीला घेरण्याची आयतीच संधी महाविकास आघाडीतील नेत्यांना मिळत आहे. त्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अजित पवार हे महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना दमदाटी करीत असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच विरोधकांनी अजित पवारांना टीकेचे लक्ष्य केल्याने ते चांगलेच अडचणीत आले आहेत.
अजितदादांचे स्पष्टीकरण
'माझा उद्देश कायद्याच्या हस्तक्षेप अंमलबजावणीमध्ये करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी तसेच ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसेच धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य महिला बजावणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचे राज्य हेच सर्वात महत्त्वाचे आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे', असे या प्रकरणावर अजितदादांनी स्पष्टीकरण दिले.
दादागिरी म्हणजे हा सत्तेचा माज वडेट्टीवार
कुठे चुकीचे, नियमबाह्य काम होत असेल आणि पोलीस त्यावर कारवाई करत असतील तर त्यांना दम देणे, धमकावणे योग्य नाही. महायुती सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही. सरकार हे सेवक असताना ते मालक असल्यासारखे वागत आहेत. सत्तेचा माज सत्ताधाऱ्यांना आला आहे. आम्ही मालक, तुम्ही नोकर अशा थाटात सत्ताधारी वागत आहेत, अशी सडकून टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
नेमके प्रकरण काय ?
सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुडू गावात शेतात काम सुरू असताना तेथील आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा तेथे पोहोचल्या. रस्ते बांधकामासाठी बेकायदेशीर वाळू उत्खननाच्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी त्या तेथे पोहोचल्या होत्या. यावेळी गावकरी आणि घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट फोन करून डीएसपी अंजली कृष्णा यांना फोन दिला. फोनवरून अजितदादांनी कृष्णा यांना दमदाटी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण लागले.