मुंबई : मुंबई महापालिकेचा कार्यभार संपुष्टात आल्यानंतर प्रशासकीय राजवट सुरू असताना तसेच शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर माजी नगरसेवकांना देण्यात येणाऱ्या निधीवाटपावरून कायम आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आता पुन्हा एकदा निधीवाटपात दुजाभाव झाला असून भाजप व शिंदेंच्या माजी नगरसेवकांना निधीवाटपाची खैरात केली, असा आरोप ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसने केला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी न्यायालयात दाद मागितली असून लवकरच निर्णय आमच्या बाजुने येईल, असा विश्वास पालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केला आहे.
निधीवाटपात दुजाभाव केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने आणि काँग्रेसने ऑक्टोबर महिन्यात केला होता. त्यानंतर समान निधीवाटप करण्यात येईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र पुन्हा एकदा शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या माजी नगरसेवकांना दणकून निधी देण्यात आला आहे, असा आरोप करण्यात येत आहे.
७ मार्च २०२२ रोजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि मुंबई महापालिकेत प्रशासकीय राज्य आहे. प्रशासकीय राज्यात मुंबई महापालिकेचा कारभार भाजप हाकत असल्याचा आरोप ठाकरेंची शिवसेना व काँग्रेसने केला आहे. त्यात मुंबई महापालिकेत भाजप आमदार व पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कार्यालय उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपचे वर्चस्व असा आरोपही विरोधकांनी केला आहे. त्यात राज्य सरकारने पालिका प्रशासनावर दबाव आणून शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी असलेल्या विभागांना निधी न देण्याचे धोरण सुरू केले आहे. याचवेळी शिंदेंची शिवसेना व भाजपने आपल्या लोकप्रतिनिधींना निधीवाटपात कोट्यवधी रुपयांची खैरात केली.
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये असाच प्रकार समोर आला होता. मुंबईतील विकासकामांसाठी निधी हवा असल्यास पालकमंत्र्यांच्या शिफारशीने देण्याचा निर्णयही पालिका प्रशासनाने घेतला होता. यावर शिवसेनेकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. मात्र पुन्हा एकदा एफ. उत्तर विभागापासून असाच प्रकार सुरू झाल्याचे शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ, काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.
काँग्रेस न्यायालयात
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मुंबईतील भाजपच्या आमदारांना ४५० कोटी तर शिंदे गटाच्या आमदारांना १२० कोटी रुपये देण्यात आले होते. तर शिवसेना, काँग्रेसला एकही पैसा देण्यात आला नव्हता. माहिती अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली होती. याबाबत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची लवकरच सुनावणी होऊन निकाल आपल्या बाजुने लागेल, असा विश्वास काँग्रेसचे रवी राजा यांनी व्यक्त केला आहे.