मुंबई

‘अपना बाजार’ची आता वैद्यकीय सेवा क्षेत्रातही गरुडझेप; ग्राहकांना डिस्काउंटसह घरपोच मिळणार ब्रँडेड औषधे, कॅन्सरग्रस्तांनाही दिलासा

ग्राहकांना दर्जेदार व किफायतशीर दराने गृहोपयोगी वस्तू पुरविण्याबरोबरच रक्तदान, वैद्यकीय शिबिरे, गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार यासारखे उपक्रम राबवून सामाजिक-शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेल्या व मागील ७७ वर्षे अविरत सेवा बजावून ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरविणाऱ्या ‘अपना बाजार’ने आता वैद्यकीय सेवा क्षेत्रातही गरुडझेप घेण्याचा दृढनिर्धार केला असल्याची माहिती अनिल गंगर यांनी सोमवारी दिली.

Swapnil S

मुंबई : ग्राहकांना दर्जेदार व किफायतशीर दराने गृहोपयोगी वस्तू पुरविण्याबरोबरच रक्तदान, वैद्यकीय शिबिरे, गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार यासारखे उपक्रम राबवून सामाजिक-शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेल्या व मागील ७७ वर्षे अविरत सेवा बजावून ग्राहकराजाचा विश्वास सार्थ ठरविणाऱ्या ‘अपना बाजार’ने आता वैद्यकीय सेवा क्षेत्रातही गरुडझेप घेण्याचा दृढनिर्धार केला असल्याची माहिती ‘अपना बाजार’चे कार्याध्यक्ष अनिल गंगर यांनी सोमवारी दिली. त्यांच्यासमवेत कार्यकारी संचालक जगदीश नलावडे हेदेखील उपस्थित होते.

दैनिक ‘नवशक्ति’ व ‘द फ्री प्रेस जर्नल’ वृत्तपत्र समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक कर्नानी, संचालक अभिषेक कर्नानी यांनी गंगर व नलावडे यांचे स्वागत करून त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यानंतर त्यांनी ‘नवशक्ति’ व ‘द फ्री प्रेस जर्नल’च्या पत्रकारांशी संवाद साधला. ‘अपना बाजार’ची आजवरची यशस्वी वाटचाल, आगामी ग्राहकाभिमुख योजना याविषयी त्यांनी माहिती दिली.

गंगर पुढे म्हणाले, ‘काळानुरूप ग्राहकांच्या गरजा बदलत आहेत. याआधी ग्राहकांचे प्राधान्यक्रम ओळखून ‘अपना बाजार’ने दर्जेदार गहू, तांदूळ, साखर, विविध प्रकारच्या डाळी, कडधान्ये सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चालविला. यापुढे ग्राहकांना गृहोपयोगी वस्तूंबरोबरच आरोग्य व शिक्षण क्षेत्रात सोयीसवलती हव्या आहेत. त्यांची ही बदलती गरज लक्षात घेऊन बृहन्मुंबई क्षेत्रात पुढील आठवड्यापासून ‘अपना बाजार’मार्फत ग्राहकांना घसघशीत सवलतीच्या दरात ब्रॅण्डेड औषधे पुरविण्याची योजना प्रत्यक्षात उतरणार आहे. त्याद्वारे बृहन्मुंबईतील रुग्णांना मोठा दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. विशेष म्हणजे ही औषधे घरपोच पोहचविण्याचा आमचा मानस आहे. याशिवाय, कर्करोगासारख्या असाध्य रोगाशी दोन हात करीत असताना महागड्या औषधांनी हतबल झालेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देण्याचीही योजना आम्ही लवकरच आणणार आहोत.

‘अपना बाजार’च्या गौरवशाली वाटचालीचा इतिहास सांगताना ते म्हणाले की, आजकालच्या ‘डिपार्टमेंटल स्टोअर्स’ व ‘मॉलसंस्कृती’ची जनक म्हणजे आमची ‘अपना बाजार’ संस्था आहे. आमचेच ‘ग्राहोपयोगी मॉडेल’ जसेच्या तसे उचलून काही कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. तथापि, आमचा दर्जेदार वस्तू देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आजही चालूच आहे. या भांडवलावरच आमची विश्वासार्हता टिकून आहे. लोकांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि त्यांना जीवनाश्यक वस्तू रास्त दरात मिळाव्यात यासाठी सर्वसामान्यांनी, गिरणी कामगारांनी ‘अपना बाजार’ची १९४८मध्ये मुहूर्तमेढ रोवली. ही संस्था अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन विराजमान झाली. सध्याच्या स्पर्धात्मक युगात ‘अपना बाजार'नेही कात टाकून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दालन तसेच व्यवसाय विस्तार करण्याचे धोरण आखले आहे. मुंबईतील सर्वात जुनी रिटेल विक्रीची साखळी चालविणाऱ्या 'अपना बाजार'ने ‘आयटी’च्या माध्यमातून वस्तू विक्री व सेवा विस्तारण्याचे निश्चित केले असून याकरिता भरीव गुंतवणूक करण्यात येणार आहे.

आपल्या विविध उपक्रमांची माहिती देताना ते म्हणाले, ‘अपना बाजार’च्या नायगाव येथील मुख्यालयासह मुंबई परिसरात १६ शाखा आहेत. कोकणात ५ आणि गुजरातेत (उमरगाम) एक शाखा आहे. अपना बाजार आपल्या भागधारकांना १५ टक्के वार्षिक लाभांश देत आहे. बचत गट, लघु उद्योगांची उत्पादने अपना बाजारमध्ये मोठ्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यावरही आमचा भर आहे.

ते म्हणाले, देश-विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फसगत होऊ नये व त्यांना योग्य प्रकारे शिक्षण मिळावे यादृष्टीनेही भविष्यात पावले टाकण्यात येणार आहेत. शिक्षण क्षेत्रातही बहुमोल कामगिरी बजाविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. समाजवादी विचारसारणीची कास धरलेल्या ‘अपना बाजार’मार्फत विशेषत: नोकरभरती करण्याकरिता विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात ‘पार्ट टाइम जॉब’ करू इच्छिणाऱ्यांनाही संधी दिली जाणार आहे.

गारमेंट, होजिअरीही उपलब्ध होणार

वैद्यकीय सुविधेपाठोपाठ अपना बाजार लवकरच ‘गारमेंट’, ’होजिअरी’ही ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. ग्राहकाेपयाेगी वस्तूंची घरपोच सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी विजेवर चालणारी दुचाकी वाहने अपना बाजारच्या ताफ्यात आणून पर्यावरण संरक्षणाला हातभार लावण्यात येईल, अशी माहिती गंगर यांनी दिली.

मुसळधारचा इशारा! राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

ध्वजारोहणास नाशिकऐवजी गोंदिया दिल्याने भुजबळ नाराज? प्रकृतीच्या कारणावरून जाण्यास दिला नकार

आम्हालाही "कोट्यवधी मोजा, गुलाल उधळा"चे आमिष; माजी आमदार संजय चव्हाण यांचा खळबळजनक आरोप

Mumbai : आगामी BMC निवडणुकीच्या कामास नकार; साडेतीन हजार आरोग्य स्वयंसेविकांचा पवित्रा

पाकिस्तानवर मेहरबान ट्रम्प! ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’, ‘माजीद ब्रिगेड’चा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश