तुला चार दशकातील सिनेपत्रकारितेने काय दिले? असा प्रश्न अधूनमधून कोणी मला करत असतोच, त्यावर मी म्हणतो, अनेक सकारात्मक गोष्टी आवर्जून सांगता येतील. त्यात एक आहे, अनेक नामवंतांच्या लहान-मोठ्या असंख्य भेटीगाठी आणि त्यात एक उल्लेखनीय आशा भोसले यांची भेट. साधारण सतरा वर्षांपूर्वी पेडर रोडवरील प्रभू कुंज येथे आपल्या एका कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांना आमंत्रित केले असता आशा भोसले यांच्या भेटीचा योग आला... आणि असा काही सुखावलो. गतवर्षीदेखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त दुबईत आयोजित करण्यात आलेल्या आशा भोसले यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाची माहिती करून देण्याच्या पत्रकार परिषदेत त्यांना आवर्जून मी एक प्रश्न केला (यूट्यूबवर ही पत्रकार परिषद उपलब्ध आहे.) आज हे सांगण्यामागचे कारण काय?
चुरा लिया है तुमने जो दिल को
नजर नहीं चुराना सनम
बदल के मेरी तुम जिंदगानी
कहीं बदल न जाना सनम...
या कायमच तारुण्यात असलेल्या गाण्याचे वय एक्कावन्न झाले आहे. तरीही ते गाणे वीस वा पंचविशीतच आहे. आशा भोसले यांचे स्वतःचे हे एक आवडते गाणे. काहींच्या डोळ्यासमोर नासिर हुसेन निर्मित व दिग्दर्शित 'यादों की बारात'मधील झीनत अमान, विजय अरोरा, गिटार आणि दोन ग्लास एकमेकांवर हळूवार वाजवली जातात असा अख्खा 'सीन ' आला असेल. काय भारी गाणे आहे हो. काही गाण्यांना वय नसते. काळाची मर्यादा नसते. चित्रपट पडद्यावरुन उतरतो. रिळे गोडाऊनमध्ये जातात. चित्रपट मागे पडतो. फ्लॅशबॅक सदरात जमा होतो. पण काही गाणी मात्र रसिक श्रोत्यांची पिढी बदलली, गाणे ऐकण्याच्या ( रेडिओ ते डिजिटल), पाहण्याच्या ( चित्रपटगृहाच्या पडद्यावर यापासून ते हातातील मोबाईलवर, ओटीटीवर ) पध्दती बदलल्या तरी ती 'तरुण'च राहतात. ही किमया गीतकार, संगीतकार व पार्श्वगायक यांचीच असते.
काही गाण्यांना वय नसते. ती देव आनंदप्रमाणे सदैव चैतन्यमय असतात.ती कधीच जुनी होत नाहीत.(तरी 'मला जुनी गाणी फार आवडतात ' असं का बरे म्हणतात?) कितीदाही ऐकली, आठवली, गुणगुणली, पाहिली तरी कायमच तारुण्यात असतात. चुरा लिया...अगदी तस्सेच.
आजच्या सोशल मिडियात तुमच्याही पाहण्यात एक व्हिडिओ आला असेल, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आशा भोसले चुरा लिया... चा अंतरा गायल्या. तेव्हाही आशा भोसले एक्याण्णव वयाच्या वाटत नाहीत (त्यांनाही वय ही गोष्ट लागू होत नाही) आणि उपस्थितही यावेळी ठेका धरतात. स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार सोहळ्यातील तो क्षण आहे. या गाण्यासाठी 'यादों की बारात 'च्या इपी/एल पी/ थर्टी थ्री तबकड्या रेकॉर्ड ब्रेक विकल्या गेल्या, इराणी हॉटेलमधील ज्यूक बॉक्समध्ये वन्स मोअर, आठ आण्याचे नाणे टाकले गेले यात काहीच आश्चर्य नाही. चित्रपटाची गीते मजरुह सुल्तानपुरी यांची असून संगीत राहुल देव बर्मन यांचे आहे. हे गाणे आशा भोसले व मोहम्मद रफी यांनी गायलंय. तरी आशा भोसले यांच्यासाठी ते जास्त ओळखले जाते. काय भारी गायलयं नि काय पिक्चरायझेशन झालंय. ज्याला वेल पॅकेज म्हणतात ते गाणे असेच असते. गाण्याची सिच्युएशन, त्याचा मुखडा, त्याचे प्रेझेंटेशन, गाण्याची सुरुवात, त्याचा अंतरा, एका छोट्याश्या पार्टीतील हळूवार प्रेमाची कबुली, आजूबाजूचे सगळेच हे गाणे ऐकताहेत; मोहक, मादक, आकर्षक झीनत अमान, 'सभ्य रुपातील ' विजय अरोरा, दोघांची नजरानजर, खाणाखुणा, भावमुद्रा, गिटारवादन, गाण्याची वाढती रंगत. या गाण्यासाठी नाझ चित्रपटगृहात मी हा चित्रपट सात - आठ वेळा वेगवेळ्या ॲन्गलमधून पाहिला. कधी दोन रुपये वीस पैशांत स्टॉलचा पब्लिक म्हणून तर कधी तीन रुपये तीस पैशात अप्पर स्टॉलचा दर्शक म्हणून पाहिला. चार रुपये चाळीस पैशाचे बाल्कनीचे तिकीट फार महाग वाटे. ही त्या काळातील मध्यमवर्गीयांची मानसिकता.या पिक्चरने पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला होता.
आशाजींनी झीनत अमानचा मूर्तिमंत मधाळपणा आपल्या गायनात परफेक्ट पकडला. जणू झीनतच गातेय असं वाटतं. 'दम मारो दम 'पासूनचे ते हिट्ट व फिट्ट समीकरण. ते शम्मी कपूर दिग्दर्शित 'मनोरंजन' ( १९७४) मध्ये चोरी चोरी सोला सिंगार करुंगी या गाण्यातही छान जमून आलंय. आपण कोणत्या अभिनेत्रीसाठी पार्श्वगायन करतोय हे आशा भोसले नेहमीच जाणून घेत गात आणि गाणे आणखीन खुलले जाई. झीनत अमान अभिनयासाठी कधीच ओळखली गेली नाही. अनेक गाण्यात मात्र ती मस्त खुलली, रमली. तिला चित्रपट गीत, संगीतातील नक्कीच समजत होते हे अनेक चित्रपटांतील गाण्यात दिसले. या गाण्यात ते जास्त दिसले. मुळात ती मॉडेल आणि आपलं सेक्स अपील हेच आपलं चित्रपटसृष्टीसाठीचं भांडवल हे सत्य ती मनोजकुमार (रोटी, कपडा और मकान), राज कपूर ( सत्यम शिवम सुंदरम), बी.आर. चोप्रा ( इन्साफ का तराजू) या बड्या दिग्दर्शकांच्या चित्रपटातून भूमिका साकारताना ती विसरली नाही. विजय अरोराही अभिनयासाठी ओळखला गेला नाही. याच गाण्यामुळे तो रसिकांच्या पुढील पिढीतही माहित झाला. एक हिट गाणे असं बरंच काही देत असते. ते एका काळातील चित्रपट पुढील पिढीत नेत असते. म्हणूनच चित्रपटात दर्जेदार गाणी हवीत. जी पूर्वी चित्रपती व्ही.शांताराम, राज कपूर, मेहबूब खान, गुरुदत्त, के. असिफ, विजय आनंद यांच्या चित्रपटात हमखास असे.
निर्माता व दिग्दर्शक नासिर हुसेन हे मसालेदार मनोरंजक चित्रपटांचे हुकमी नाणे. 'स्टोरीपेक्षा गीत - संगीत व नृत्य यातून पिक्चर खुलवणारे'. आपला पहिलाच चित्रपट 'तुमसा नहीं देखा' (१९५७) पासूनची त्यांची ही खासियत. यू तो हमने लाखो हंसी देखे है, जवानी मस्त मस्त, देखो कसमसे ही यातील गाणी आजही ऐकावीत/पहावीत. तीच रंगत. नासिर हुसेन यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रगती पुस्तकात गाण्यांवर मनसोक्त मनमुराद आनंद घेतला आणि कलाकारांकडून त्याच मोकळ्या ढाकळ्या मूडमध्ये करुन घेत ती रसिकांसमोर आणली. दिल देखे देखो, दिल देनेवालो दिल देना सिखो जी, बडे है दिल के काले ( दिल देके देखो, १९५९), ये आंखे उफ यूं मा..., सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था, जिया ओ जिया कुछ बोल दो ( जब प्यार किसीसे होता है, १९६१), बंदा परवर थांमलो जिगर, लाखों है यहा दिलवाले ( फिर वोही दिल लाया हू. १९६३ ), चुनरी संभाल गोरी, आजा पिया तोसे प्यार दू ( बहारों के सपने, १९६७ ), मै ना मिलूंगी, नी सुलताना रे, तुम बिन जाऊ कहा (प्यार का मौसम, १९६९ ), चढती जवानी मेरी चाल मस्तानी, दिलबर दिलसे प्यारे, गोरिया कहां तेरा देश रे, कितना प्यारा वादा (कारवा. १९७१).... नासिर हुसेन टच म्हणतात तो हाच. संगीताचा कान आणि डोळे असणारा फिल्मवाला. आणि मग 'यादों की बारात '. याचीही सगळीच गाणी लोकप्रिय. त्यानंतर नासिर हुसेन यांनी 'हम किसीसे कम नही' ( १९७७), जमाने को दिखाना है ( १९८१), मंझिल मंझिल ( १९८४) , जबरदस्त( १९८५) अशी वाटचाल करताना शेवटचे तीन पिक्चर फ्लॉप झाल्याने दिग्दर्शन संन्यास घेतला तरी गाण्यात कुचराई नाही. ती झाली हिट. नासिर हुसेन व राहुल देव बर्मन जोडी 'बहारों के सपने'पासून जमली ती प्रत्येक चित्रपटात कायम राहिली. नासिर हुसेन निर्मित व विजय आनंद दिग्दर्शित 'तिसरी मंझिल '(१९६७) आर. डी. बर्मनच्या कारकिर्दीला मोठीच लिफ्ट देणारा.
'यादों की बारात 'ची पटकथा व संवाद सलिम - जावेदचे आहेत. पण पिक्चर नासिर हुसेनसाठीच आणि खास करुन चुरा लिया... गाण्यासाठी आठवणीत आहे. येथे दिग्दर्शक दिसतोय. या पिक्चरच्या पोस्टर, होर्डिग्ज, थिएटरमधील शो कार्ड्स असे सगळीकडे त्या दिवसात. या गाण्यातील झीनत अमान व विजय अरोरा यांना स्थान. आणि ते दिसताच गाणे ओठावर व डोळ्यासमोर येई. गाण्याची लोकप्रियता अशीच भन्नाट व भरपूर हवी. पिक्चरमध्ये धर्मेंद्र, तारीक, इम्तियाज, शेट्टी, अजित यांच्याही भूमिका. लहानपणीच हरवलेले तीन भाऊ मोठेपणी सापडतात आणि एक भाऊ मां - बाप के खून का बदला घेतो अशी स्टोरी. त्यातीलच एक " चुरा लिया है, तुमने जो दिल को ".....
१९४३ साली ‘माझा बाळ’या चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘चला चला नव बाळा...’या गाण्याने आशाताईंनी चित्रपट गायनाला प्रारंभ केला होता. ४८ साली हंसराज बहल यांच्या ‘चुनरियॉं’ या चित्रपटात ‘सावन आया...’हे गीत गाऊन आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.५३ साली बिमल रॉय यांनी ‘परिणीता’साठी आशाताईंना संधी दिली, ५४ साली राज कपूर यांनी ‘बूट पॉलिश’मध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी मे क्या है...’ गायला दिलं. पुढे ओ. पी. नय्यर यांनी ५६ साली ‘सीआयडी’साठी संधी देऊन आशादीदींच्या पदरात मोठं यश दिलं.
५७ साली ‘नया दौर’मध्ये ओपींच्या उडत्या चालीवर रफीसाहाबसोबतचे ‘मॉंग के साथ तुम्हारा’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’, हेमंतकुमार यांच्या संगीतातलं ‘जागृती’मधलं ‘दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल’, सी. रामचंद्र यांचा संगीतसाज आणि भरत व्यास यांनी रचलेलं ‘नवरंग’मधलं ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘तू छुपी है कहॉंऽ मै तडपता यहॉं’, जयदेव यांचं संगीत असलेलं देव आनंद-साधनावरचं ‘हम दोनो’मधलं रोमॅण्टिक ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’, ‘काला पानी’तलं देव आनंदला विनंती करणारं मधुबालाचं ‘अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना’,मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘मेरा साया’तलं ‘झुमका गिरा रे’, ओपी-कमर जलालाबादींचं ५८ सालच्या ‘फागून’मधलं ‘एक परदेसी मेरा दिल ले गया, जाते जाते मिठा मिठा गम दे गया’, ‘तिसरी कसम’चं लोकगीतं ‘पान खाये सैया हमारो, सावली सुरतीयॉं होठ लाल लाल’, ‘किस्मत’मधलं शमशाद बेगमसोबतचं ‘कजरा मोहोब्बतवाला अखियों मे ऐसा डाला’, ‘पेईंग गेस्ट’मधलं चुलबुल्या नूतनला देव आनंद छेडतो तेव्हाचं ‘छोड दो आँचल जमाना क्या कहेगा’, ‘वक्त’मधलं ‘आगे भीऽ जाने ना तूऽ,पिछे भी जाने ना तू, जो भी है, बस यही एक पल है’, कोंबडी पकडणाऱ्या ‘बांगडू’ किशोरदांसोबतचं ‘हाल कैसा है जनाब का’, ‘हावडा ब्रिज’मधलं ‘आईयेऽ मेहरबॉं’, झीनतवरचं ‘हरे रामा’तलं ‘दम मारो दम’, ओपींचं ‘चॉंद उस्मानी-किशोरदां यांच्यावरचं ‘बाप रे बाप’मधलं ‘पिया पिया पिया मोरा जिया पुकारे, हम भी चलेंगे सैया संग तुम्हारे’, शहरयार यांनी रचलेलं खय्याम यांनी संगीत दिलेलं ‘उमराव जान’मधलं ‘इन आँखो की मस्ती के, मस्ताने हजारों है’, ‘ये क्या जगहा है दोस्तो, ये कौनसा दयार है’, ‘तुमसा नही देखा’तलं ‘सर पे टोपी लाल, हाथ मे रेशम का रूमाल, हो तेरा क्या कहना’, ‘एक मुसाफिर एक हसीना’तलं ‘बहुत शुक्रिया बडी मेहरबानी’, नासिर हुसेन यांच्या ‘तिसरी मंझील’मधलं अतिशय गोड ‘ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दुंगी जान जुदा मत होना रे’, ‘ओ हसीना जुल्फोवाली जानेजहॉं’, ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’, ‘आदमी और इन्सान’मधलं ‘जिंदगी इत्तेफाक है’, ‘अनहोनी’मधलं ‘मैने होठो से लगाई तोऽऽ हंगामा हो गया’, ‘बांगडू’सोबतचं ‘आशा’मधलं ‘इना मिना डिका’, ‘काश्मीर की कली’तलं ‘इशारों इशारों मे दिल लेनेवाले’, गुलजार यांचं ‘मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है’, हेलनच्या बहारदार नृत्यावरचं ‘कारवॉं’तलं ‘पिया तू अब तो आजा’, ‘मेरे सनम’चं ‘जाईये आप कहॉं जायेंगे, ये नजर लौटके फिर आयेंगी’, ‘ज्वेल थिफ’चं ‘रात अकेली है, बुझ गए दिये’, ‘शिकार’चं ‘पर्दे मे रहनें दो पर्दा ना उठाओ’, ‘द ग्रेट गॅम्बलर’मधलं अमिताभ-झीनतवरचं फॉरेनमध्ये होडीतलं रोमॅण्टिक ‘दो लफ्जों की हैऽऽ दिल की कहानी’,‘पुकार’मधलं ‘बचके रहना रे बाबाऽऽ बच के रहना रे’, परवीनबॉबीचं नृत्य असलेलं ‘जवानी जानेमन हसीन दिलरूबा’,‘हम किसी से कम नही’तलं ‘ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना’, ‘मुकद्दर का सिकंदर’चं ‘ओ साथी रे तेरे बिना क्या जिना’, ‘लगान’चं ‘राधा कैसे ना जले’ अशी खूप गाजलेली गाणी आशाताईंची आहेत.
मराठीत गदिमा-यशवंत देवांचं ‘उघडी नयन शंकरा, वसंत ये वनांतरी’, ‘सिंहासन’मधलं सुरेश भटांचं ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’, बहिणाबाईंचं ‘अरे खोप्यामंधी खोपा सुगरणीचा चांगला’, खेबुडकरांचं ‘सतीचं वाण’ मधलं किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला’, ‘फटाकडी’तलं नांदगांवकरांचं ‘लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर गोवा नि काश्मीरला, कुठं कुठं जायाचं हनीमूनला’, हेमंतकुमार यांच्यासोबत गायलेलं सुधीर मोघेंचं ‘हा खेळ सावल्यांचा’मधलं ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, पी. सावळाराम यांचं ‘भालू’मधलं ‘गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन’, सुधीर फडके उपाख्य बाबुजींसोबत गायलेलं खेबुडकरांचं ‘पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला’, भटांचं ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’, शांता शेळके यांनी रचलेलं ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे’,भा. रा. तांबेंचं वसंत प्रभूंच्या संगीतसाजातलं बाबुजींसोबत गायलेलं ‘तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’, ‘शापित’ मधलं सुधीर मोघेंचं गीत. परंपरेने चालत आलेले भारतीय शास्त्रीय संगीतात प्राविण्य मिळवत असताना या संगीताच्या चौकटीत त्यांनी स्वतःला अडकवून घेतले नाही. पाश्चात्य संगीत पण तेवढ्याच सहजपणे स्वीकारले.
आशाताईंची सर्वच गाणी काही मोठ्या किंवा प्रसिद्ध कलाकारांवर चित्रीत झालेली नाहीत. तर त्यांची अनेक गाणी छोट्या कलाकारांवर पण चित्रीत झालेली आहेत. पण पडद्यावर ही गाणी बघताना तो कलाकार स्वतःच्याच आवाजात गात आहे असे वाटते. लोकांच्या आवडीनिवडीमध्ये होत चाललेला बदल म्हणजेच ‘मार्केट ट्रेन्ड’ मधल्या बदलाची आशाताईंना बरोबर जाणीव असायची. म्हणूनच त्या नूतन, वहिदा रेहमान, साधना, हेमा मालिनी, नर्गीस यासारख्या आघाडीच्या नायिकांबरोबरच हेलनसारख्या अभिनेत्रीलाही योग्य आवाज देऊ शकल्या. दीर्घकाळ गायन करणाऱ्या आशा भोसले यांनी वयाच्या ८० व्या वर्षी २०१३ साली अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. आशा भोसले यांनी 'माई' या मराठी चित्रपटातून अभिनय केला .हा चित्रपट आपल्या वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडणाऱ्या मुलांची कथा सांगणारा होता. या चित्रपटात आशा भोसले यांनी 'माई'ची भूमिका साकारली होती, जी अल्झायमरने त्रस्त आहे आणि जिला तिची मुले वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतात. आशा भोसले यांनी ज्या पद्धतीने ही व्यक्तिरेखा साकारली, त्यास प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यांच्या मुलांच्या भूमिका राम कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी साकारल्या होत्या.
आशाताईंचा आवडता छंद होता तो म्हणजे स्वयंपाक. मी आयुष्यात गायिका झाली नसती तर नक्कीच चांगलीच शेफ झाली असती.लोकांना चांगले खायला घातले असते.असे एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते.पार्श्वगायनाच्या छंदाबरोबर त्यांनी हा पण छंद जोपासला.निरनिराळ्या व्हेज आणि नॉनव्हेज डिशेस शिकून घेतल्या. लोकांना उत्तम संगीताबरोबरच उत्तम खाण्याचा आनंद पण द्यावा असे त्यांना वाटू लागले. याच छंदाचे रुपांतर त्यांनी उद्योग व्यवसायात केले. परदेशामध्ये ‘आशाज’ या नावाच्या रेस्टॉरन्टची सुरुवात आपला धाकटा मुलगा आनंद याच्या सहाय्याने केली. पहिले रेस्टॉरंट दुबई येथे सुरु केले.आशाताईंच्या खास रेसिपी मिळतील अशी व्यवस्था केली.आज ही किचनवर अशाताईंचे खास लक्ष असते.तिथल्या कुकना त्या स्वतः ट्रेनिंग देतात.बघता बघता हे रेस्टॉरन्ट लोकप्रिय झाले.आता त्यांची गल्फ आणि ब्रिटनमध्ये मिळून सहा रेस्टॉरन्ट्सची मालिका आहे.ब्रिटनमधल्या बर्मिन्गहॅम येथल्या रेस्टॉरन्टला तर ‘सर्वोत्तम रेस्टॉरन्ट’ म्हणून पुरस्कार पण मिळाला आहे. हा सगळा कारभार जरी त्यांचा धाकटा मुलगा आनंद बघत असला तरी मूळ कल्पना आशाताईंची आहे. यामुळे त्या आता एक यशस्वी मराठी उद्योजिका पण झाल्या आहेत.
आशा भोसले यांनी आपल्या घरात फक्त गायकीच आणली असे नाही तर उद्योजकता आणि उद्यमशीलता पण आणली.मिळालेल्या पैशांची उद्योग व्यवसायात गुंतवणूक केली.आशाताईनी आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांना आवाज दिला आहे. त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत. आशा भोसले ही कधीच न संपणारी गोष्ट आहे....