Bhayandar : बाळासाहेब ठाकरे कलादालन दिवाळीत खुले करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश X - @PratapSarnaik
मुंबई

Bhayandar : बाळासाहेब ठाकरे कलादालन दिवाळीत खुले करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश

मीरा-भाईंदर शहरातील विविध समस्या आणि विकासकामांचा आढावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महापालिका मुख्यालयात घेतला.

Swapnil S

भाईदर : मीरा-भाईंदर शहरातील विविध समस्या आणि विकासकामांचा आढावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महापालिका मुख्यालयात घेतला. शहरातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि पाणीटंचाई लक्षात घेता अनधिकृतपणे बोअरवेलमधून पाणी उपसा करून त्याची विक्री करणाऱ्या माफियांवर कठोर कारवाई करा. तसेच भाईंदर येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन दिवाळीच्या सुट्टीत बालगोपाळांसाठी खुले करा, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

महापालिकेच्या विविध विकासकामांसंदर्भात आयोजित या आढावा बैठकीला महापालिका आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. या वेळी सरनाईक यांनी प्रशासनाला कामकाजाबाबत स्पष्ट सूचना देताना, "केवळ बैठकांचा फार्स नको, प्रत्यक्ष जमिनीवर काम दिसले पाहिजे. दिवाळीनंतर प्रत्येक कामाचा अहवाल माझ्या टेबलवर हवा," असा इशारा दिला.

बैठकीत घोडबंदर किल्ल्याजवळील जागेचे हस्तांतरण, शिवसृष्टीकडे जाणारा १८ मीटर रुंदीचा रस्ता, छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचा विकास आणि पुतळा उभारणी, खाडीकिनारा विकास, महापालिका मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम, उत्तन येथील शासकीय जागेवरील स्मशानभूमी तसेच शहरातील विविध स्मशानभूमींची सद्यस्थिती यांचा आढावा घेण्यात आला.

याशिवाय घनकचरा प्रकल्पासाठीचा निधी व खर्च, विविध समाजभवनांची स्थिती आणि उद्घाटन, सायकलिंग व जॉगिंग ट्रॅक, क्लस्टर योजनेतून वगळण्यात आलेल्या इमारतींच्या नकाशांना मंजुरी, नालेबांधणी, चेणे रिव्हर वॉटरफ्रंटकडे जाणारा १८ मीटर रुंदीचा रस्ता, पांडुरंगवाडी सिग्नल व बायपास तसेच आरोग्य आणि परिवहन सेवांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत सामावून घेण्याबाबत चर्चा झाली.

एकूण १९ विषयांवर सविस्तर आढावा घेण्यात आला. यातील काही महत्त्वाच्या विषयांवर १५ नोव्हेंबरला, म्हणजेच दिवाळीनंतर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. उर्वरित कामांनाही गती देण्यास सरनाईक यांनी सांगितले.

नागरिकांना तातडीने दिलासा देण्याचे आदेश

शहरातील काही भागांत निर्माण झालेली पाणीटंचाई आणि त्यातून बोअरवेलच्या पाण्याच्या अनधिकृत विक्रीचा सुरू झालेला काळाबाजार यावर मंत्री सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करून अनधिकृत पाणीविक्री करणाऱ्या माफियांचे कंबरडे मोडावे, असे आदेश त्यांनी दिले. पाण्याचा व्यापार करून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ज्या भागांत पाणीटंचाईची समस्या आहे, त्या ठिकाणी महापालिकेने तातडीने पर्यायी बोअरवेलची व्यवस्था उभारून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

मुलांना विविध उपक्रमांचा अनुभव घेण्याची संधी

महासभेच्या प्रशासकीय मंजुरीच्या तांत्रिक प्रक्रियेत अडकलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन दिवाळीच्या सुट्टीत बंद राहू नये, अशी भूमिका सरनाईक यांनी मांडली. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे कलादालन तातडीने बालगोपाळांसाठी खुले करावे, अशा सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या. या कलादालनामुळे शहरातील लहान मुलांना सांस्कृतिक, कलात्मक आणि शैक्षणिक उपक्रमांचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालय सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : फटाके फोडणाऱ्यांवर नोडेल अधिकाऱ्यांची नजर; पोलीस व पालिकेचे पथक तैनात, १९१६ हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे आवाहन

मुंबईकरांना मिळणार ४०० नवे लोखंडी कचरा डबे; एका डब्यासाठी पंधराशे रुपये अधिक मोजणार

IIT Bombay Student Suicide Case : आत्महत्येची सीबीआय चौकशी करा! साहिल वाकोडेच्या पालकांची न्यायालयात याचिका

Mumbai : १४ ट्रॅक्शन सबस्टेशन्सची उभारणी अंतिम टप्प्यात; बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात पाच, तर गुजरातमध्ये ९ सबस्टेशन्स

Thane : 'देवाभाऊंवरच विश्वास, तेच न्याय मिळवून देतील'; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाची मुख्यमंत्र्यांना साद