Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार 
मुंबई

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार

वाहतूककोंडीमुळे वेसावे, मढ, लोखंडवाला, मिल्लत नगर, गोरेगाव आणि बांगूर नगर परिसरातील नागरिकांचा दररोजचा प्रवास वेळखाऊ ठरत असताना मुंबईकरांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पातील वेसावे आंतरबदल ते बांगूर नगर उन्नत मार्ग पूर्ण झाल्यानंतर वांद्रे-सी लिंकच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना पश्चिम उपनगरांकडे जाण्यासाठी अधिक वेगवान पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

Swapnil S

मुंबई : वाहतूककोंडीमुळे वेसावे, मढ, लोखंडवाला, मिल्लत नगर, गोरेगाव आणि बांगूर नगर परिसरातील नागरिकांचा दररोजचा प्रवास वेळखाऊ ठरत असताना मुंबईकरांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पातील वेसावे आंतरबदल ते बांगूर नगर उन्नत मार्ग पूर्ण झाल्यानंतर वांद्रे-सी लिंकच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना पश्चिम उपनगरांकडे जाण्यासाठी अधिक वेगवान पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. सध्या वांद्रे-सीलिंक ते गोरेगाव बांगूर नगर दरम्यान ४० ते ५० मिनिटे लागतात. परंतु या प्रकल्पामुळे वेळेची व इंधनाची बचत होणार असून अवघ्या १० ते १५ मिनिटांत प्रवास पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. वर्सोवा ते बांगूर नगर साडेचार किमीचा मार्ग २०२८ अर्थात पुढील दीड वर्षांत पूर्ण होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे मुंबई किनारा रस्ता (उत्तर) या ६० किलोमीटरच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात वेसावे ते भाईंदर ही शहरे किनारी मार्गाने जोडण्याचे नियोजन आहे. त्यातील वेसावे आंतरबदल ते बांगूर नगर हा उन्नत मार्ग महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी ४.५४ किलोमीटर, तर मुख्य उन्नत मार्गाची लांबी ४.३० किलोमीटर आहे. तब्बल ४५ मीटर रुंदीच्या या मार्गावर ४+४ अशा आठ मार्गिका असणार आहेत. त्यामुळे पश्चिम उपनगरातील विद्यमान रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होऊन वाहनचालकांना अधिक अखंड प्रवासाचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी या कामाचा आढावा घेत नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.

चार प्रमुख टप्प्यांत विभागणी

डिसेंबर २०२८ पर्यंत पुलाची उभारणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी उपलब्ध २७महिन्यांत विविध कामे समांतर पद्धतीने राबवण्यावर भर देण्यात येत आहे. पॅकेज ए ची चार प्रमुख टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये एम एस आरडीसी पुलाशी जोडणारा इंटरगेट पाइंट, नाना नानी उद्यान ते अमरनाथ टॉवर, अमरनाथ टॉवर ते मोगरा नाला आणि मोगरा नाला ते पॅकेज एचे अंतिम टोक यांचा समावेश आहे.

शहरातील वाहतूककोंडी फोडणार

दक्षिण मुंबईतून थेट दहिसर-भाईंदरपर्यंतचा प्रवास करता यावा यासाठी कोस्टल रोड उत्तर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. वर्सोवा ते भाईंदर किनारा मार्ग प्रकल्पातील टप्पा ए मधील वर्सोवा आंतर बदल मार्गिका ते गोरेगाव बांगूर नगर उन्नत मार्ग हा एकूण साडे चार किलोमीटरचा मार्ग डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. या पुलाला जोडूनच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूची जोड मिळणार आहे. सागरी सेतूही २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महापालिकेचा पूल आणि एमएसआरडीसाचा सागरी सेतू २०२८ पर्यंतच्या मुदतीत पूर्ण झाल्यास २०२९ पासून वांद्रे ते गोरेगाव बांगुरनगर प्रवास सुसाट होणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वेळेआधीच मान्सूनची माघार; मुंबईसह महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू, हवामान खात्याची घोषणा

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

'मविआ'त नाराजीनाट्य; काँग्रेसने विधान परिषद उमेदवारी जाहीर केल्याने आघाडीत बिघाडी; नेत्यांमध्ये आज पुन्हा चर्चा

शिवाजी पार्कवर विनापरवानगी आंदोलन; ५०० जणांवर गुन्हे, दीपकेंसह आयोजकांचा समावेश

जंतरमंतरवर १५० आंदोलक ताब्यात; नेहा बोरा, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांचा समावेश