मुंबई : ताडदेव–नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासिस उड्डाणपूल पालिकेकडून सर्व कामे पूर्ण करून वाहतुकीसाठी सज्ज झाला असतानाही तो अद्याप खुला करण्यात आलेला नाही. १५ महिने ६ दिवसांत पूर्ण झालेला हा पूल अंतिम मुदतीच्या तब्बल चार महिने आधीच तयार झाला आहे. दरम्यान, रेल्वेकडून 'ना-हरकत प्रमाणपत्रां'ची पालिकेला प्रतीक्षा आहे, असे पूल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे प्रवासी आणि चालकांची गैरसोय कायम आहे.
मुंबई महापालिकेने बेलासिस पुलाच्या पुनर्बांधणीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले आहे. पुलाला संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र तसेच सुरक्षितता प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. मात्र, रेल्वेकडून ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ मिळाल्यानंतरच वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने पूल वाहतुकीला खुला केला जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दक्षिण मुंबईतील जहांगीर बोमन बेहराम मार्गावरील (पूर्वीचा बेलासिस रोड) हा पूल मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव परिसरांना लोहमार्गावरून पूर्व–पश्चिमेला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. पुलाच्या पुनर्बांधणीमुळे गेल्या दोन वर्षांपासून बाधित झालेली पूर्व-पश्चिम वाहतूक व्यवस्था पुन्हा सुरळीत होण्याची अपेक्षा होती. मात्र, उद्घाटन रखडल्याने नागरिकांची निराशा वाढली आहे. दरम्यान, पूल जर बांधून पूर्ण झाला असेल तर ती सुविधा प्रवासी आणि चालकांना मिळायला हवी. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीही कमी होणार आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
वाहतूककोंडीला बसणार आळा
हा पूल सुरू झाल्यास जहांगीर बोमन बेहराम मार्ग, दादासाहेब भडकमकर मार्ग (ग्रँट रोड), विशेषतः पठ्ठे बापूराव मार्ग आणि महालक्ष्मी स्थानक पुलावरील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. बेलासिस पुलाची एकूण लांबी ३३३ मीटर असून त्यापैकी १३८.३९ मीटर पूर्वेला, १५७.३९ मीटर पश्चिमेला आणि ३६.९० मीटर रेल्वे हद्दीत आहे. ७ मीटर रुंदीचा वाहन मार्ग व दोन्ही बाजूंना प्रशस्त पदपथ अशी या पुलाची रचना आहे.
वळसा घालून करावा लागतो प्रवास
दरम्यान, पूल सुरू न झाल्याने मुंबई सेंट्रल, ताडदेव आणि भायखळा परिसरातील वाहतुकीवर थेट परिणाम झाला आहे. वाहनांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत असून प्रवासाच्या वेळेत ३० ते ४० मिनिटांची वाढ होत आहे. नायर आणि जे. जे. रुग्णालयाकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही या वाहतूककोंडीचा फटका बसत आहे.