

मुंबई : २६ जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या 'तिरंगा मार्च'च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी (दि. २५) कार्यकर्ते आणि समर्थकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. NEET आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा मोर्चा पूर्णपणे अराजकीय असावा, यासाठी कोणत्याही पक्षाचा झेंडा आणू नये, तसेच कोणत्याही राजकीय नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करू नये, असे आवाहन त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केले.
राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी -
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना आणि शिवसैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र,
येत्या २६ जुलैला NEET परीक्षेतील गोंधळ, त्याबद्दल विद्यार्थ्यांचं सुरु असलेलं आंदोलन आणि ते आंदोलन चिरडण्याचा सरकारचा सुरु असलेला प्रयत्न याविरोधात आपण 'तिरंगा मार्च' काढत आहोत. त्याबद्दल तुम्हाला आपल्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून, मध्यवर्ती कार्यालयांकडून सूचित करण्यात आलं असेलच.
हा 'तिरंगा मार्च' हा दिल्लीतलं सरकार आणि त्यांच्या आदेशानुसार दिल्लीतील पोलीस जी मुजोरी दाखवत आहेत याचा निषेध करण्यासाठी आहे. तसंच हा मोर्चा जे विद्यार्थी सरकारला अजिबात न जुमानता ठामपणे उभे आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या घरच्यांसाठी आणि जे दिल्लीला जाऊ शकत नाहीत किंवा मुंबईला येऊन निषेध व्यक्त करू शकत नाहीत त्यांना तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे हे दाखवण्यासाठी आहे.
हा 'तिरंगा मार्च' आहे. हा पूर्णपणे अराजकीय आहे, इथे कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या समर्थनाच्या घोषणा नसतील. सरकारचा निषेध असेल, आणि देशभरातील विद्यार्थ्यांना आणि तरुण तरुणींना आपण जो पाठिंबा दर्शवत आहोत त्यासाठीच्या घोषणा असतील. मोर्च्याचे निमंत्रक मी आणि उद्धव असलो तरी आमच्याही नावाने कुणी घोषणा द्यायच्या नाहीत. हा विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे याचं भान आपण बाळगायचं आहे आणि ते तुम्ही बाळगालच याबद्दल तिळमात्र शंका नाही.
बाकी मोर्च्याला गालबोट लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, कारण आपण काय करू शकतो याचा अंदाज सगळ्यांनाच आहे. पण तरीही काही उत्साही असतात. ते आले आणि काही वेडंवाकडं करायचा प्रयत्न केला, काही चुकीच्या घोषणा देऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जरी केला किंवा तिथे आलेल्या पालकांना ( खासकरून महिलांना आणि मुलींना ) जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना, जवळ जे कोण पोलीस असतील त्यांच्या ताब्यात ‘समारंभपूर्वक’ द्या. ते कसं हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण पोलीस जिथे नसतील, तिथे अशांचा 'पाहुणचार' कसा करायचा याचा अनुभव आणि मनगटातील शक्ती दोन्ही आपल्याकडे आहेच.
बाकी महाराष्ट्र सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या हे सांगायची गरजच नाही. ते तुम्ही येणारच. पण जास्तीत जास्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना पण घेऊन या, त्यांची मोर्च्यात काळजी घ्या आणि ते पुन्हा सुखरूप घरी जातील हे पहा. बाकी सरकारचं माहित नाही पण महाराष्ट्रातील पोलीस हे आपल्यासोबत आहेत कारण त्यांच्यासमोर पण मुलाबाळांच्या आयुष्याचा पण प्रश्न आ वासून उभा आहे.
बाकी कुठे भेटायचं किती वाजता भेटायचं याचा तपशील तुमच्याकडे आहेच. तेंव्हा २६ जुलैला 'तिरंगा मार्च' ला भेटूया. सर्वांनी सकाळी १० वाजता शिवाजी पार्क येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्या जवळ जमायचं आहे ! आम्ही आपली , विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची वाट बघतोय! जनतेच्या मनातील संताप काय आहे हे या शांततापूर्ण मोर्चाने दिल्लीश्वरांना दाखवून देऊया!
राज ठाकरेंची डीसीपींसोबत चर्चा
'तिरंगा मार्च'च्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सुरक्षा तयारीला वेग दिला आहे. शनिवारी मुंबईचे उपायुक्त (डीसीपी) महेंद्र पंडित आणि जयंत माने यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आणि नियोजनाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
रविवारी (दि. २७) शिवाजी पार्क येथून सुरू होणारा 'तिरंगा मार्च' सिद्धिविनायक मंदिर परिसरात संपणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.