मुंबई : सुरक्षित व आरामदायी प्रवास म्हणून आजही प्रवासी बेस्ट बसेसना पसंती देतात. मात्र मुंबईकरांची हीच दुसरी लाइफलाइन प्रवाशांसह पादचाऱ्यांसाठी 'काळ' ठरतेय. गेल्या पाच वर्षांत बेस्ट बसचे ८३४ अपघात झाले असून या अपघातात ८८ जण दगावले आहे. बेस्ट बसच्या अपघातात जखमी अथवा मृतांच्या कुटुंबीयांना बेस्ट उपक्रमाने ४२.४० कोटींची नुकसानभरपाई दिली आहे, तर दुर्घटनेस जबाबदार १२ कर्मचाऱ्यांना बडतर्फ, तर २४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे माहिती अधिकारातून समोर आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बेस्ट प्रशासनाकडे गेल्या पाच वर्षांत घडलेल्या अपघाताची, जीवितहानी आणि आर्थिक नुकसानभरपाईची माहिती मागितली होती. बेस्टचे वरिष्ठ वाहतूक अधिकारी ईगाल बेंजामिन यांनी अनिल गलगली यांना गेल्या पाच वर्षांतील माहिती दिली आहे. याबाबतची आकडेवारी बेस्ट प्रशासनाची सुरक्षिततेची जबाबदारी अधोरेखित करते. यावरून प्रशासन आणि कर्मचाऱ्यांकडून अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता स्पष्ट होते, असे अनिल गलगली यांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षात ८३४ बेस्ट बस अपघात झाले असून यात बेस्टचे आणि खासगी कंत्राटदार यांचा समावेश आहे. बेस्टचे ३५२ अपघात झाले असून यात ५१ जण मृत्युमुखी पडले, तर खासगी कंत्राटदारांकडून करण्यात आलेल्या ४८२ अपघातांत ३७ जीवितहानी झाली आहे. वर्ष २०२२ - २३ आणि वर्ष २०२३ - २४ मध्ये सर्वाधिक प्रत्येकी २१ जीवितहानी झाली आहे.
गेल्या पाच वर्षांत मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमींना देण्यात येणाऱ्या आर्थिक नुकसानभरपाईबाबतची एकूण ४९४ प्रकरणे होती. यात सर्वाधिक रक्कम ही वर्ष २०२२-२३ मध्ये देण्यात आली आहे. या वर्षात १०७ प्रकरणात सर्वाधिक आर्थिक नुकसानभरपाई रक्कम १२.४० कोटी आहे.