धैर्य गजारा/मुंबई
कांदिवली पश्चिम येथील ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये भटक्या श्वानांना अन्न भरवल्याच्या कारणावरून एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला घर रिकामे करण्याची धमकी देणे ‘बेस्ट’ प्रशासनाला महागात पडले आहे. या प्रकरणी मुंबई महापालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाने जेठवानगर येथील बजाज रोडवरील ‘बेस्ट स्टाफ क्वार्टर्स’च्या प्रशासनाला एक शैक्षणिक नोटीस बजावली आहे. प्राण्यांना अन्न भरवणाऱ्या नागरिकांना त्रास देऊ नका, अशी तंबी देत वसाहतीमध्ये श्वानांना अन्न भरवण्यासाठी एक हक्काची जागा निश्चित करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.
‘बेस्ट’च्या कल्याणकारी विभागाने १४ मे रोजी ५९ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी जनार्दन ओहोळ यांना घर रिकामे करण्याची नोटीस पाठवली होती. ओहोळ यांचे कुटुंब गेल्या १० वर्षांपासून या वसाहतीत राहत असून प्राण्यांना अन्न भरवल्यामुळे इतर रहिवाशांना त्रास होतो आणि कुत्रे चावण्याच्या घटना वाढतात, असा आरोप ‘बेस्ट’च्या वरिष्ठ कल्याण अधिकाऱ्यांनी केला होता.
या अन्यायाविरोधात ओहोळ यांचे सुपुत्र क्षितिज यांनी पालिकेच्या डॉग कंट्रोल युनिटकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेत पालिकेने ‘बेस्ट’ प्रशासनाची नोटीस फेटाळून लावली. भारतीय कायद्यानुसार रस्त्यावरील प्राण्यांची काळजी घेणाऱ्या नागरिकांना संरक्षण मिळाले असून प्राण्यांबद्दल दयाभाव दाखवणे हे संविधानानुसार नागरिकांचे कर्तव्य असल्याचे महापालिकेने नोटिसीत नमूद केले.
असे आहेत नियम, कायदे
देशातील विविध न्यायालयांनी प्राण्यांना अन्न भरवणाऱ्यांच्या हक्कांचे नेहमीच रक्षण केले आहे. नियमित अन्न मिळाल्यामुळे मानव आणि प्राण्यांमधील संघर्ष कमी होतो, असा दाखला पालिकेने दिला. भटक्या श्वानांना मारहाण करणे, हाकलून देणे किंवा दुसऱ्या परिसरात सोडणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. प्राण्यांना केवळ २००१ च्या नियमानुसार निर्बीज करून, त्यांचे लसीकरण करून मूळ ठिकाणीच सोडणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले.
...तर तुरुंगवास व दंड होऊ शकतो
प्राणिप्रेमींचा छळ केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो आणि प्राण्यांवर क्रूरता दाखवल्यास प्राणिछळ प्रतिबंधक कायद्यानुसार दंड व तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असा इशाराही पालिकेने दिला आहे. पालिकेच्या या तातडीच्या कारवाईचे प्राणिप्रेमी आणि सामाजिक संस्थांनी स्वागत केले आहे.