मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमात खासगी कंपन्यांमार्फत चालविल्या जाणाऱ्या बसगाड्यांवरील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर मोठा मोर्चा काढत आंदोलन केले.
‘एसएमटीएटीपीएल असोसिएट्स’ (डागा ग्रुप), मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्यूशन्स प्रा. लि., बी.व्ही.जी. इंडिया लि. आणि इतर खासगी कंपन्यांमार्फत चालविल्या जाणाऱ्या बेस्ट बसगाड्यांवरील कर्मचाऱ्यांनी ‘समान कामाला, समान दाम’ या तत्त्वानुसार वेतन आणि सेवा अटी लागू करण्याची जोरदार मागणी केली. बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागात कायमस्वरूपी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबतच खाजगी ठेकेदारांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे काम तंतोतंत सारखेच आहे. मात्र, वेतन आणि इतर सेवा अटींमध्ये मोठी तफावत असल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
या आंदोलनाला मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. बेस्ट प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. बेस्ट उपक्रमातील खाजगी बस कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
याबाबत कामगार संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले की, ‘बेस्ट उपक्रम हा मुंबई शहरातील अत्यंत महत्त्वाचा सार्वजनिक परिवहन सेवा पुरवणारा उपक्रम आहे. या सेवेसाठी खाजगी कंपन्यांच्या बसगाड्यांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही बेस्टच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसारखेच वेतन आणि सेवा अटी लागू व्हायला हव्यात. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा.
वडाळा येथे बसची तोडफोड
बेस्ट उपक्रमातील खासगी कंत्राटदार मातेश्वरी कंपनीच्या बसवाहक, चालक यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारल्यामुळे वडाळा येथे सदर कंपनीच्या खासगी बसवाहक, चालक यांनी डेपोच्या बाहेर आलेल्या काही बसेसचे तोडफोड करून नुकसान केले.
प्रवाशांचे प्रचंड हाल
या आंदोलनामुळे रस्त्यावर ‘बेस्ट’च्या बसेस कमी प्रमाणात धावल्याने बस स्टॉपवर प्रवाशांची मोठी रांग लागली होती. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेक ठिकाणी प्रवासी बसथांब्यावर तासभर ताटकळत राहिल्यामुळे अनेकांना आपल्या इच्छितस्थळी जाण्यास मोठ्या प्रमाणात विलंब झाला.