मुंबई : मुंबई महापालिकेच्या परीक्षण विभागामार्फत भरती होत नसल्यामुळे पदे रिक्त आहेत. प्रशासनाकडून कंत्राटी कर्मचारीही उपलब्ध करून दिले जात नसल्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा पडत आहे. यामुळे कामगारांमध्ये असंतोष आहे. रुग्णालयांमध्ये रिक्त पदांच्या सापेक्ष घेण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कंत्राटाची मुदत संपल्याने नूतनीकरणाच्या फाईलवर अतिरिक्त आयुक्त डॉ. बिपिन शर्मा सही करत नाहीत. यामुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मत संबंधित रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक/वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केली आहे. पालिकेच्या विविध विभागांमध्ये भरती होत आहे. मात्र परीक्षण विभागामध्ये कोणत्याही पदासाठी भरती होत नाही. विभागाचा अतिरिक्त भार सद्यस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर पडत आहे.
कंत्राटी कर्मचारी उपलब्ध झाले नाहीत तर अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडून कर्मचाऱ्यांची दमछाक होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांच्या अडवणुकीचा निषेध करण्यासाठी वांद्रे येथील भाभा रुग्णालयाप्रमाणे इतर सर्व उपनगरीय रुग्णालयांतील कर्मचारी आंदोलन करतील.
- डॉ. संजय कांबळे - बापेरकर, उपाध्यक्ष , म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना