भाईंंदर : भाईंदर पूर्वच्या बीपी रोडवरील स्वामी नारायण मंदिर परिसरात नागरी वस्तीत शुक्रवारी बिबट्या शिरला. या बिबट्याच्या हल्ल्यात ७ जण जखमी झाले असून त्यात एक २३ वर्षीय तरुणीच्या तोंडावर झडप घातल्याने ती जास्त जखमी आहे. पारिजात इमारतीच्या बी-विंगमधील १०१ क्रमांकाच्या खोलीत बिबट्या शिरला होता. शेवटी त्या घरातच त्याला अडकवून ठेवत वन विभागाने आठ तासांनंतर गुंगीचे औषध असलेले इंजेक्शन बंदुकीतून मारून त्याला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर वन विभागाच्या पिंजऱ्यातून बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले.
शुक्रवारी सकाळी भाईंदरच्या स्वामी नारायण मंदिर परिसरात बिबट्या आल्याचे समजल्याने खळबळ उडाली. त्याने प्रकाश यादव, श्याम सहानी, दिपू भौमिक, छगनलाल बागरेचा यांच्यावर हल्ला केला. याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील भारती टांक यांच्या घरात तो घुसला. त्याने भारती व त्यांची मुलगी खुशी यांच्यावर हल्ला केला. त्या घाबरून घराबाहेर पळाल्या. त्यावेळी आतमध्ये भारती यांची मुलगी अंजली झोपली होती. आरडाओरडा पाहून ती उठली असता बिबट्याने तिच्या तोंडावर चावा घेत पंजे मारले. ती मोठ्याने ओरडली असता बिबट्या बाजूला झाला. पालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी जगदीश पाटील, लिडिंग फायरमन बुद्धा नांगरे, फायरमन नंदकुमार घरत व मयुर पाटील, यंत्रचालक अमर पाटील आदींनी खिडकीची जाळी काढून रक्तबंबाळ अंजली हिला बाहेर काढले व तिचा जीव वाचवला. जखमींना पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात नेले. अंजली हिला नंतर केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन
बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी बंदुकीने इंजेक्शन मारण्याचे प्रयत्न वन विभागाने सुरू केले. दुपारी अडीच वाजता तो काहीसा बेशुद्ध झाला. त्यानंतर वन विभाग, अग्निशमन दल अधिकारी व डॉक्टर यांनी जवळ जाऊन डॉक्टरांमार्फत बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. बेशुद्ध बिबट्याला वन विभागाच्या वाहनातून संजय गांधी उद्यानात नेण्यात आले.