भाईंंदर : मीरा-भाईंदर पालिकेच्या भाईंदर पूर्वेतील इंद्रलोक परिसरात असलेली पाच मजल्यांची शाळेची इमारत खासगी शिक्षण संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर घेतला. महासभेत हा ठराव ५७ मतांच्या बहुमताने मंजूर झाला. काँग्रेस, शिंदे गटाच्या नगरसेवकांनी ठरावाला विरोध केला तर भाजप नगरसेविका नीला सोंस मतदानापासून तटस्थ राहिल्या. दरम्यान, स्वतःची सीबीएसई शाळा सुरू करण्याचे पालिकेचे नियोजन असताना ही इमारत खासगी संस्थेला देण्याच्या निर्णयामुळे शिक्षण धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिका दिशाभूल करत आहे
या निर्णयाला विरोध करताना काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी पालिका प्रशासनावर आरोप केले. शहरातील गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई धर्तीवर मोफत दर्जेदार शिक्षण देण्याचे महापालिकेचे नियोजन असतानाही २०२३ पासून प्रशासकीय काळात शाळा सुरू करण्यात आली नाही. शाळेची भव्य इमारत पूर्ण होऊन तयार असतानाही त्यामध्ये पालिकेची शाळा सुरू न करता ती खासगी संस्थेला भाड्याने देणे म्हणजे पालिकेची दिशाभूल असल्याचा तसेच पालिका शाळेचे बाजारीकरण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पालिकेचा निर्णय
मीरारोड येथील एन. एल. दालमिया शाळेला इंद्रलोक येथील महापालिकेच्या शाळेतील दोन मजले भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून त्यामध्ये २४ वर्गखोल्या उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महापालिकेला वार्षिक १ कोटी ४६ लाख रुपये भाडे मिळणार आहे. मीरारोड येथील दालमिया शाळेच्या इमारतीत आग लागल्याने तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे महापौरांकडून स्पष्ट करण्यात आले.