भाईंदर: भाईंदर पश्चिमेच्या उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडूनच कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यालगत असलेल्या आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणात बेकायदा वृक्षतोड करून त्या ठिकाणी डेब्रिज आणि मातीचा भराव केला जात असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमींनी केली. याप्रकरणी जबाबदार पोलीस निरीक्षकांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी जागरूक नागरिकांनी केली आहे.
उत्तन येथे उत्तन सागरी पोलीस ठाण्यासाठी २ हेक्टर क्षेत्र आरक्षित आहे. पोलीस ठाण्याच्या कुंपण भिंतीचे काम सुरू असताना, आतील भागातील अनेक जुन्या आंब्या, काटेसावर, भेंडी, नारळ यांच्या सह अनेक वृक्षांची बेकायदा कत्तल केली.
अनेक झाडांच्या फांद्या छाटून त्यांच्या बुंध्यामध्ये डेब्रिज, गाळ आणि दगड टाकून झाडांना जाणीवपूर्वक मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. याप्रकरणी पर्यावरण संरक्षण कायदा आणि वृक्ष संरक्षण कायद्यानुसार झाडे तोडणे किंवा त्यांच्या मुळाशी भराव करणे हा गंभीर गुन्हा आहे.
मात्र, या ठिकाणी कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट मॅनेजमेंट नियमावलीला हरताळ फासून डंपर आणि जेसीबीच्या सहाय्याने दिवसरात्र भराव सुरू असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी पर्यावरणप्रेमीकडून केली जात आहे. उत्तन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस -निरीक्षक, डंपरचालक मालक, जेसीबीचालक आणि संबंधित कंत्राटदारावर नागरी झाडांचे संरक्षण अधिनियम, पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.
पोलीस अधिकाऱ्यांसह बेकायदा डेब्रिज आणि अन्य भराव करणारे मालक, जेसीबीचालक-मालक तसेच सर्व डंपरचालक संबंधित यांच्यावर तत्काळ नागरी झाडांचे अधिनियम, कन्स्ट्रक्शन वेस्ट अॅक्ट मॅनेजमेंट, पर्यावरण संरक्षण कायदा, भारतीय न्याय संहिता आदीनुसार तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सत्यकाम फाऊंडेशन चे अध्यक्ष अॅड. कृष्णा गुप्ता, गो ग्रीन फाऊंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. वीरभद्र कोनापुरे व सचिव साबीर सय्यद, 'फॉर फ्युचर इंडिया'चे अध्यक्ष हर्षद ढगे आदींनी केली आहे.