मुंबई

भाजपकडून सत्तास्थापनेच्या गुप्त हालचाली सुरू

वडोदऱ्यात त्यांनी मध्यरात्री एकनाथ शिंदे यांच्याशी गुप्त बैठक घेतल्याची चर्चा आहे

प्रतिनिधी

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले असतानाच भाजपकडून सत्तास्थापनेच्या गुप्त हालचाली सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागील चार दिवसांतील दिल्लीवाऱ्या वाढल्या असतानाच त्यांनी शुक्रवारी मध्यरात्री खास विमानाने वडोदरा प्रवास (व्हाया इंदूर) केल्याचे उघड झाले आहे. वडोदऱ्यात त्यांनी मध्यरात्री एकनाथ शिंदे यांच्याशी गुप्त बैठक घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील वडोदऱ्यात होते; मात्र ते या बैठकीला उपस्थित होते का? याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

एकनाथ शिंदे गुवाहाटी येथील हॉटेलबाहेरील प्रसारमाध्यमांचा ससेमिरा चुकवून हॉटेलच्या मागील दाराने बाहेर पडले आणि विमानतळाच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर पहाटेच्या सुमारास ते परत हॉटेलमध्ये दाखल झाले. यावेळेत त्यांनी गुजरातमध्ये वडोदऱ्याला येऊन फड‌णवीस यांच्याशी गुप्त बैठक घेतल्याचे बोलले जात आहे. या बैठकीला भाजपचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते, असे समजते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हालचालींवरही गेल्या काही दिवसांपासून साऱ्यांचे लक्ष आहे. त्यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या असतानाच त्यांनी खास विमानाने शुक्रवारी मुंबई ते वडोदरा प्रवास केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, मुंबईपासून वडोदरा जवळ असतानाही त्यांनी इंदूरमार्गे वळसा घालून विमान का नेले? यावरून तर्क-वितर्क केले जात आहेत.

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय पेचप्रसंगात भाजप मात्र कमालीचे मौन बाळगून आहे. भाजपनेते यावर कोणतेही वक्तव्य करताना दिसत नाहीत; मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या हालचाली कमालीच्या वाढल्या आहेत. दोन वेळा दिल्लीला जाऊन त्यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत यावर खल झाल्याचे वृत्त आहे. अशातच त्यांनी शुक्रवारी रात्री गुजरात दौरा केल्याचे उघड झाले आहे. वडोदरा येथे ते विशेष विमानाने गेले होते; मात्र ते थेट न जाता इंदूरमार्गे गेले. विशेष म्हणजे, दुरुस्तीसाठी इंदूर विमानतळ रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असताना शुक्रवारी फडणवीसांचे विमान येणार म्हणून विमानतळ रात्रभर सुरू ठेवण्यात आले होते.

वडोदरा मुंबईपासून अवघ्या ४०० किलोमीटरवर आहे, तर मुंबईहून इंदूर ६०० किलोमीटर. अशात मुंबईहून थेट वडोदरा जाण्याऐवजी फडणवीस इंदूरच्या मार्गाने येथे का गेले? यावर चर्चा होत आहे. मुंबईहून आपला गुजरात दौरा लपवण्यासाठी ते इंदूरमार्गे गेल्याचे बोलले जात आहे. फडणवीस विशेष विमानाने शुक्रवारी रात्री १०.४५ वाजता मुंबईहून इंदूरला पोहोचले होते. येथे विमानात इंधन भरण्यात आले. यानंतर ११ वाजता विमान इंदूरहून वडोदरासाठी रवाना झाले. शनिवारी पहाटे ४.४० वाजता ते याच विशेष विमानाने वडोदराहून इंदूरला पोहोचले आणि विमानात इंधन भरल्यानंतर ४.५५ वाजता परत मुंबईसाठी रवाना झाले.

काहीही केले तरी मराठी मनावर कोरलेले 'शिवसेना' नाव पुसता येणार नाही; उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले

उमेदवारी अर्ज फेटाळल्याप्रकरणी आज सुनावणी; विविध कारणास्तव अर्ज फेटाळल्याने उमेदवारांची उच्च न्यायालयात धाव

विद्यार्थ्यांचा ताण होणार दूर; शैक्षणिक संस्थांमध्ये होणार मानसशास्त्रज्ञांची नियुक्ती, जिल्हास्तरीय निरीक्षण समितीची स्थापना

भाजपकडून २७ जणांची हकालपट्टी; जळगाव महापालिका निवडणुकीत उमेदवारी मागे न घेता केली होती बंडखोरी

मेट्रो-१ स्थानकांवर सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनची सुविधा