मुंबई : बीएलओंना निवडणूक कार्यालयात कार्यरत ठेवल्यास कारवाई करणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यास त्यांच्या मूळ आस्थापनेतील कामकाज सोडून स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) कार्यालयात कार्यरत ठेवू नये, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र राज्य) एस. चोक्कलिंगम यांनी दिले आहेत.
मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात कार्यरत स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी आणि अन्य निवडणूक विषयक अधिकाऱ्यांची, मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध बाबींसंदर्भात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील सभागृहात बुधवारी बैठक पार पडली.
यावेळी चोक्कलिंगम म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, एकाही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यास स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात कार्यरत ठेवू नये.
मूळ आस्थापनेतील कामकाजावर परिणाम नको
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी म्हणाले की, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी त्यांच्या मूळ आस्थापनेतील कामकाजावर परिणाम न होऊ देता निवडणुकीचे कामकाज करावयाचे आहे. तथापि, त्यांना त्यांचे मूळ कामकाज सोडून आठवड्यातून काही दिवसांसाठी देखील स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात ठेवू नये.