मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि.२) राजकीय घडामोडींना मोठा वेग आला. पक्षांतर्गत नाराजीमुळे बंडखोर म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अनेक उमेदवारांना अखेर पक्ष नेतृत्वाच्या हस्तक्षेपानंतर माघार घ्यावी लागली. मात्र काही बंडखोर उमेदवारांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.
बीएमसीच्या २२७ जागांसाठी एकूण २,५१६ नामांकन अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १६४ अर्ज तांत्रिक कारणांमुळे अवैध ठरवण्यात आले. अंतिम टप्प्यात २,१८५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी, तब्बल ४५३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता १,७२९ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीने बंडखोर उमेदवारांना रोखण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. काही ठिकाणी हे प्रयत्न यशस्वी ठरले, तर काही प्रभागांमध्ये बंडखोरांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
बंडखोरांमुळे रंगत वाढलेले प्रभाग
प्रभाग ९५ मध्ये शिवसेना ठाकरे गट-मनसे उमेदवार हरि शास्त्री यांच्याविरोधात माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर बंडखोर म्हणून रिंगणात उतरले आहेत. प्रभाग १५९ मध्ये ठाकरे गटाच्या प्रविणा मोराजकर यांच्याविरोधात कमलाकर नाईक, प्रभाग २०२ मध्ये माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्याविरोधात विजय इंदुलकर, प्रभाग १९६ मध्ये पद्मजा चेंबूरकर विरुद्ध संगीता जगताप, प्रभाग १९३ येथे हेमांगी वरळीकर विरुद्ध सूर्यकांत कोळी, प्रभाग १७७ मध्ये महायुती उमेदवार कल्पेश कोठारी यांच्याविरोधात माजी भाजप नगरसेवक नेहल शहा निवडणुकांच्या रणधुमाळीत असणार आहेत.
शेवटच्या दिवशी माघार घेतलेले बंडखोर
प्रभाग २२५ येथील भाजप मुंबई उपाध्यक्ष कमलाकर दळवी यांनी भाजप उमेदवार हर्षिता नार्वेकर यांच्याविरोधातील अर्ज मागे घेतला. तर प्रभाग १ मधील सुनीता यादव यांनी उमेदवारी मागे घेतल्याने रेखा यादव यांचा मार्ग मोकळा झाला. प्रभाग १०६ (मुलुंड) येथील बंडखोर सागर देवरे यांनी माघार घेतली तर प्रभाग १७३ येथे भाजप बंडखोर वैशाली पगारे यांनी अर्ज मागे घेतला. याशिवाय, प्रभाग २२१ मधील जनक संघवी तर प्रभाग १८५ येथील रमाकांत गुप्ता यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
बंडखोरी रोखण्यात काही अंशी यश मिळाले असले, तरी अनेक प्रभागांमध्ये अंतर्गत नाराजी कायम राहिल्याने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.