BMC च्या रुग्णालयांतील अग्निसुरक्षेचा बोजवारा; अग्निशमन दलाच्या तपासणीत धक्कादायक माहिती उघड, नायरमधील फायर ऑडिटमध्ये त्रुटी संग्रहित छायाचित्र
मुंबई

BMC च्या रुग्णालयांतील अग्निसुरक्षेचा बोजवारा; अग्निशमन दलाच्या तपासणीत धक्कादायक माहिती उघड, नायरमधील फायर ऑडिटमध्ये त्रुटी

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणेचे ऑडिट केले असता रुग्णालयातील फायर फायटिंग यंत्रणा बंद अथवा अपुरी असल्याची धक्कादायक माहिती अग्निशमन दलाने केलेल्या तपासणीत उघड झाले आहे.

Swapnil S

मुंबई: मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणेचे ऑडिट केले असता रुग्णालयातील फायर फायटिंग यंत्रणा बंद अथवा अपुरी असल्याची धक्कादायक माहिती अग्निशमन दलाने केलेल्या तपासणीत उघड झाले आहे. विशेष म्हणजे मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयाच्या सातही इमारतीत फायर फायटिंग सिस्टम बंद असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या अग्निसुरक्षेचा रुग्णालयातील बोजवारा उडाला आहे.

मुंबई पालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटनांचा धोका कायम असताना अग्निसुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या आहेत. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने केलेल्या तपासणीत महापालिका रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणा अपुऱ्या असल्याचे, तर काही ठिकाणी त्या कार्यरत नसल्याचे आढळले आहे. मुंबई सेंट्रल येथील बी. वाय. एल. नायर रुग्णालयातील सातही इमारतींचे अग्निशमन विभागाकडून फायर ऑडिट करण्यात आले.

या ऑडिटमध्ये विविध त्रुटी निदर्शनास आल्या असून त्यांची पूर्तता करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले आहेत. मॅन्युअल फायर अलार्म, कंट्रोल पॅनेल, बूस्टर पंप, स्प्रिंकलर प्रणाली आणि स्मोक डिटेक्टर यांसारख्या महत्त्वाच्या अग्निसुरक्षा यंत्रणा उभारण्याची आवश्यकता दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

पाच वर्षे देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदारावर

या प्रकल्पांतर्गत अग्निसुरक्षा यंत्रणेचा पुरवठा, उभारणी, चाचणी आणि कार्यान्वितीकरण करण्यासाठी कार्यादेश दिल्यापासून २४ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर एक वर्षाचा दोषदायित्व कालावधी आणि पुढील पाच वर्षे सर्वसमावेशक देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार आहे. संपूर्ण कामासाठी १९ कोटी २२ लाख २४ हजार ९०५ रुपयांचा खर्च दर्शवण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

...तर मोठी जीवितहानी

नायर रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी ये-जा करतात. वॉर्ड, अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर आणि अपघात विभाग चोवीस तास सुरू असतात. या ठिकाणी उच्च विद्युत दाबावर चालणारी वैद्यकीय उपकरणे आणि विविध विद्युत यंत्रणांचा सातत्याने वापर होतो. अशा परिस्थितीत आग लागल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निविदा प्रक्रिया राबवली

या पार्श्वभूमीवर नायर रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाने निविदा प्रक्रिया राबवली. या कामासाठी सुधारित कार्यालयीन अंदाज १४ कोटी ९२ लाख ५३ हजार ७६६ रुपये (जीएसटी वगळून) तयार करण्यात आला आहे. निविदेमध्ये मे. ओमेक्स कंट्रोल सिस्टम आणि मे. रिलायन्स फायर प्रोटेक्शन सिस्टिम्स या दोन कंपन्या तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्या, तर मे. युनिटेक कंपनीची निविदा अपात्र ठरली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : फटाके फोडणाऱ्यांवर नोडेल अधिकाऱ्यांची नजर; पोलीस व पालिकेचे पथक तैनात, १९१६ हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे आवाहन

विदेशापेक्षा देशी विमान प्रवास महागला; मुंबई-दिल्ली विमान भाडे २६,५६०, मुंबई-लंडन २५,५०० रुपये

'इंडिया' आघाडीची आज महारॅली

Mumbai : सीएनजी एक रुपयाने पुन्हा महागला; ९० रुपये किलोवर दर पोहोचला

'इस्रो'ने लाँच केले जीएसएलव्ही-एफ१८; उपग्रह 'एनव्हीएस-०३' अवकाशात स्थापित