मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळाले असून, उद्धव ठाकरेंची २५ वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आली आहे. मात्र, भाजपला बहुमतापर्यंत मजल मारता न आल्याने त्यांना शिंदे गटाची मदत घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे शिंदे गटाने अडीच वर्षांच्या महापौरपदाची मागणी केल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘महापौर हा महायुतीचाच होईल,’ असे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर असले तरी त्यांनी महापौरपदाच्या निवडीबाबत सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या दोघांमध्ये महापौरपदाबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. आता फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर मुंबईच्या महापौरपदाचा तिढा सुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आतापर्यंत मौन बाळगलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “शिवसेना आणि भाजप हे मुंबई महानगरपालिकेत महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले असून मुंबईत महायुतीचा महापौर होईल. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यांसह महायुती म्हणून जिथे-जिथे एकत्र निवडणूक लढलो, त्याठिकाणी महायुतीचाच महापौर बनवण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी मोठ्या विश्वासाने महायुती म्हणून सेना-भाजपला मतदान केले असून त्यांच्या मतांशी प्रतारणा करून कोणताही वेगळा निर्णय शिवसेना घेणार नाही. नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.”
मुंबई महानगरपालिकेत भाजपचे सर्वाधिक ८९ नगरसेवक निवडून आले. त्यापाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाचे ६५ तर शिंदे गटाचे २९ आणि काँग्रेसचे २४ तर मनसेचे ६ नगरसेवक निवडून आले. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची संख्या ११८ होत आहे, त्यामुळे भाजपचे महापौरपदाचे स्वप्न शिंदे गटाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, याची जाणीव भाजपला आहे. महापौरपद सोडण्यास भाजपने नकार दिला तर शिंदे गट स्थायी समिती किंवा इतर वैधानिक समित्यांमध्ये विशेष स्थान मागण्याची शक्यता आहे. नगरसेवकांची फोडाफोडी होऊ नये, यासाठी शिंदेंनी विशेष खबरदारी घेतली असून सर्व नगरसेवकांना वांद्रे पश्चिम येथील ‘ताज लँड्स एन्ड’ येथे हलवण्यात आले आहे.
मुंबईबाहेर न जाण्याचे भाजपचे नगरसेवकांना आदेश
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिंदे यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत असले तरी अद्याप महापौरपदाची निवड झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत महापौरपदाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत पुढील ८ ते १० दिवस नवनिर्वाचित नगरसेवकांनी मुंबईबाहेर जाऊ नये, असे आदेश भाजपकडून देण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी आठ ते दहा दिवस लागणार असल्याकारणाने कोणीच मुंबईबाहेर जाऊ नये, अशा सूचना नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत.
मुंबईत महापौर बनवणे सहज शक्य नाही - संजय राऊत
“मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत, याचा अर्थ मुंबईचा महापौर कोण असावा हे दिल्लीतून आधीच ठरवण्यात आले आहे. यामध्ये केवळ भाजपच नाही, तर एक उद्याेगपतीसुद्धा निर्णय घेणार आहे. मुंबईकरांनी दिलेले आकडे पाहता, शिवसेना ठाकरे गटाचा महापौर बनवणे इतके सोपे नाही. महापौरपदासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही,” असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.