Mumbai : रस्ते धुलाईला ब्रेक! पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आठ कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : रस्ते धुलाईला ब्रेक! पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आठ कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी रस्त्यांवर पाण्याची फवारणी आणि धुलाई करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला ब्रेक लागला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी रस्त्यांवर पाण्याची फवारणी आणि धुलाई करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला ब्रेक लागला आहे. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, मुंबईत लागू असलेली १० टक्के पाणीकपात आणि काही भागांत कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा या बाबी लक्षात घेऊन रस्ते धुण्यासाठी टँकर भाड्याने घेण्याचा सुमारे ८ कोटी रुपयांचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत फेटाळून लावण्यात आला.

मुंबईतील हवेची गुणवत्ता २०२३ पासून सातत्याने खालावत असल्याने धूळ प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना बंधनकारक करण्याबरोबरच शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाण्याची फवारणी आणि धुलाई करण्यास सुरुवात करण्यात आली. बांधकामे आणि विकासकामांमुळे उडणारी धूळ हवेत मिसळू नये, तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कमी व्हावेत, हा या उपाययोजनांमागील उद्देश आहे.

काँग्रेसने केला तीव्र विरोध

याच पार्श्वभूमीवर महापालिकेने यंदाही सात परिमंडळांतील रस्ते धुण्यासाठी १५० दिवसांच्या कालावधीकरिता टँकर भाड्याने घेण्याची योजना आखली होती. यापूर्वीच्या कंत्राटांची मुदत संपल्याने नव्याने निविदा मागवून कंत्राटदारांची निवडही करण्यात आली होती. मात्र, राज्यातील पाणीटंचाई आणि मुंबईतील पाणीकपात लक्षात घेता, या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेसने तीव्र विरोध केला.‌ अखेर स्थायी समितीने आठ कोटी रुपयांचा रस्ते धुलाईचा प्रस्ताव फेटाळला.

२१३ टँकरद्वारे होणार होती धुलाई

महापालिकेच्या प्रस्तावानुसार मुंबईतील सुमारे ६७७ किलोमीटर लांबीचे ३७७ सार्वजनिक रस्ते धुलाईसाठी निश्चित करण्यात आले होते. या रस्त्यांची दररोज पाण्याने स्वच्छता करण्यासाठी दोन हजार, पाच हजार आणि दहा हजार लिटर क्षमतेचे एकूण २१३ टँकर वापरण्याचे नियोजन होते. यासाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिल्लीची नाकेबंदी, झुरळे आक्रमक; रेल्वे रद्द, मेट्रो, इंटरनेट सेवा बंद, ड्राय-डे जाहीर; परवानगी नाकारली तरी CJP आंदोलनावर ठाम

जेन-झीला घाबरून सरकारची आणीबाणी; संपूर्ण देशच बंद करून टाका; CJP चा केंद्रावर हल्ला

माशी मारण्यासाठी हातोड्याचा वापर नको; सर्व काही ठप्प करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

इंडिया आघाडीचे नेते भेटले राष्ट्रपतींना, मतचोरीचा मुर्मू यांनी इन्कार केला नाही - राहुल गांधी

'एसटी'च्या भूखंडांवर व्यावसायिक इमले; प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र निविदा बंधनकारक