RBI ATM Rules : एटीएममधून पैसे काढणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोफत व्यवहार, शुल्क आणि अलर्टबाबत नवे नियम

RBI ने एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भात नवे निर्देश जारी केले आहेत. मोफत व्यवहारांची मर्यादा, २३ रुपयांपर्यंतचं शुल्क, बँकांचे अलर्ट आणि दुकानातून पैसे काढण्याचे नियम जाणून घ्या.
RBI ATM Rules : एटीएममधून पैसे काढणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोफत व्यवहार, शुल्क आणि अलर्टबाबत नवे नियम
RBI ATM Rules : एटीएममधून पैसे काढणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोफत व्यवहार, शुल्क आणि अलर्टबाबत नवे नियम'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : एटीएममधून पैसे काढताना महिन्याला किती व्यवहार मोफत करता येतात आणि त्यानंतर किती शुल्क आकारलं जातं, याची अनेक ग्राहकांना माहिती नसते. त्यामुळे कधी कधी खात्यातून शुल्क कापल्यानंतरच ते लक्षात येतं. आता याच पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ग्राहकांसाठी महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. यापुढे ग्राहकांनी महिन्यात किती मोफत एटीएम व्यवहार केले आणि मर्यादा संपल्यानंतर किती शुल्क लागू शकतं, याची माहिती देण्याची व्यवस्था बँकांना करावी लागणार आहे. मात्र, मोफत व्यवहारांची संख्या आणि त्यानंतर आकारण्यात येणारं कमाल शुल्क पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.

किती एटीएम व्यवहार मोफत करता येणार?

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, बचत खाते असलेल्या ग्राहकांना स्वतःच्या बँकेच्या एटीएममधून महिन्याला पाच मोफत व्यवहार करता येतात. दुसऱ्या बँकेचं एटीएम वापरल्यास मुंबईसारख्या महानगरांमध्ये तीन, तर इतर शहरांमध्ये पाच व्यवहार मोफत करता येतात. मात्र, बँकांना वाटल्यास त्या ग्राहकांना ठरलेल्या मर्यादेपेक्षा अधिक मोफत एटीएम व्यवहारांची सुविधाही देऊ शकतात

मोफत मर्यादा संपल्यावर किती शुल्क?

महिन्याची मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर बँक प्रत्येक अतिरिक्त एटीएम व्यवहारासाठी जास्तीत जास्त २३ रुपये आणि त्यावर लागू कर आकारू शकते. मात्र, ग्राहकांना किती मोफत व्यवहार शिल्लक आहेत आणि पुढील व्यवहारांसाठी किती शुल्क लागू होईल, याची माहिती बँकांना द्यावी लागणार आहे.

तसंच, एटीएमवरील व्यवहारांची मर्यादा आणि शुल्काची माहिती इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषेत उपलब्ध करून देणं आवश्यक असेल.

RBI ATM Rules : एटीएममधून पैसे काढणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोफत व्यवहार, शुल्क आणि अलर्टबाबत नवे नियम
RBI New Rules : आता एका क्लिकवर थांबवता येणार डिजिटल पेमेंट; 'स्टॉप स्विच'सह आरबीआयचे नवे नियम, वाचा सविस्तर

व्यवहार फेल झाला तर पैसे कापले जाणार का?

एटीएममधून पैसे काढताना मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला किंवा एटीएममध्ये रोकड उपलब्ध नसल्यामुळे व्यवहार अयशस्वी झाला, तर ग्राहकाला त्यासाठी शुल्क भरावं लागणार नाही. अशा अयशस्वी व्यवहाराची गणना महिन्याच्या मोफत व्यवहारांमध्येही केली जाणार नाही.

दुकानातूनही काढता येणार रोख रक्कम

रिझर्व्ह बँकेने दुकानांमधील पॉइंट ऑफ सेल (PoS) मशीनद्वारे रोख पैसे काढण्याचे नियमही स्पष्ट केले आहेत. ही सुविधा असलेल्या दुकानांमधून ग्राहक डेबिट कार्ड, पूर्ण केवायसी केलेली प्रीपेड पेमेंट साधनं किंवा उपलब्ध यूपीआय सुविधेद्वारे पैसे काढू शकतात.

या सुविधेत एका व्यवहारात जास्तीत जास्त २ हजार रुपये आणि महिन्याला एकूण १० हजार रुपये काढता येतील. त्यासाठी आकारण्यात येणारं सेवा शुल्क रकमेच्या १ टक्क्यापेक्षा अधिक असू शकणार नाही. विशेष म्हणजे, रोख पैसे काढण्यासाठी त्या दुकानातून कोणतीही वस्तू खरेदी करणं बंधनकारक नसेल.

नवे नियम कधीपासून लागू?

रिझर्व्ह बँकेने २७ नोव्हेंबर २०२६ रोजी एटीएम आणि दुकानांमधून रोख पैसे काढण्यासंबंधी एकत्रित नियमावली जारी केली आहे. हे निर्देश तत्काळ लागू झाले आहेत. यामध्ये २००८ ते २०२२ या काळातील १७ जुन्या परिपत्रकांमधील नियम एकत्र करण्यात आले आहेत.

त्यामुळे मोफत एटीएम व्यवहारांची संख्या वाढलेली नसली, तरी ग्राहकांना त्यांच्या व्यवहारांची आणि आकारण्यात येणाऱ्या शुल्काची अधिक स्पष्ट माहिती मिळणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)