RBI New Rules : आता एका क्लिकवर थांबवता येणार डिजिटल पेमेंट; 'स्टॉप स्विच'सह आरबीआयचे नवे नियम, वाचा सविस्तर

आरबीआयच्या नव्या प्रस्तावित नियमांनुसार ग्राहकांना डिजिटल पेमेंट बंद करण्याची, व्यवहारांची मर्यादा ठरवण्याची आणि 'स्टॉप स्विच' वापरण्याची सुविधा मिळू शकते. जाणून घ्या नवे नियम आणि अंमलबजावणीची तारीख.
RBI New Rules : आता एका क्लिकवर थांबवता येणार डिजिटल पेमेंट; 'स्टॉप स्विच'सह आरबीआयचे नवे नियम, वाचा सविस्तर
RBI New Rules : आता एका क्लिकवर थांबवता येणार डिजिटल पेमेंट; 'स्टॉप स्विच'सह आरबीआयचे नवे नियम, वाचा सविस्तर'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

तुमच्या बँक खात्यातून अचानक पैसे काढले जात असल्याचा संशय आला, तर काय कराल? अशा वेळी एका क्लिकवर पैसे जाणारे डिजिटल व्यवहार थांबवता आले तर? लवकरच बँक ग्राहकांना अशी सुविधा मिळण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी नवे नियम आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी आरबीआयने मसुदा मार्गदर्शक तत्त्वे सादर केली आहेत. यानुसार, ग्राहकांना डिजिटल पेमेंट सुविधा स्वतः सुरू किंवा बंद करता येणार आहे. तसेच व्यवहारांची मर्यादा निश्चित करण्यासोबतच फसवणुकीचा संशय आल्यास 'स्टॉप स्विच'च्या मदतीने पैसे बाहेर जाणारे व्यवहार रोखता येतील. एवढेच नाही, तर मोठ्या रकमेच्या काही व्यवहारांसाठी विश्वासू व्यक्तीची मंजुरी घेण्याची तरतूदही प्रस्तावित आहे. नेमके काय आहेत हे नवे नियम आणि ग्राहकांना त्याचा कसा फायदा होणार? जाणून घेऊया.

डिजिटल पेमेंटवर ग्राहकांचे नियंत्रण वाढणार

प्रस्तावित नियमांनुसार, ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग यांसारख्या डिजिटल पेमेंटच्या सुविधा गरजेनुसार सुरू किंवा बंद करता येतील. एखादी सुविधा काही काळासाठी बंद ठेवण्याचाही पर्याय असेल. ग्राहकाला ती पुन्हा सुरू करायची असल्यास बँकेकडून ओळख पडताळणी केली जाईल.

नवीन बँक खाते उघडताना डिजिटल पेमेंटच्या सुविधा सुरुवातीला बंद ठेवण्याचा प्रस्ताव आहे. ग्राहकाची स्पष्ट संमती आणि आवश्यक ओळख पडताळणी झाल्यानंतरच या सुविधा सुरू करता येतील.

डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या २४ तासांसाठी बँकेला पैसे हस्तांतरित करण्याची एकूण मर्यादा निश्चित करावी लागेल. त्यानंतर बँकेच्या जोखीम मूल्यांकनानुसार ही मर्यादा टप्प्याटप्प्याने वाढवता येईल.

व्यवहारांची मर्यादा ग्राहकच ठरवणार

नव्या प्रस्तावानुसार, ग्राहकांना डिजिटल व्यवहारांसाठी स्वतःची मर्यादा निश्चित करता येईल. यामध्ये प्रत्येक व्यवहारासाठी, एखाद्या विशिष्ट व्यक्तीला पैसे पाठवण्यासाठी किंवा दिवसभरातील एकूण व्यवहारांसाठी स्वतंत्र मर्यादा ठरवता येईल. सर्व डिजिटल माध्यमांवरील एकत्रित व्यवहारांची मर्यादाही निश्चित करता येईल.

RBI New Rules : आता एका क्लिकवर थांबवता येणार डिजिटल पेमेंट; 'स्टॉप स्विच'सह आरबीआयचे नवे नियम, वाचा सविस्तर
WhatsApp Update : व्हॉट्सॲप युजर्ससाठी गुड न्यूज! आता एका ग्रुपमध्ये तब्बल १,५०० जणांना करता येणार अ‍ॅड, वाचा सविस्तर

उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाने एका व्यक्तीला पैसे पाठवण्यासाठी दिवसाला २० हजार रुपयांची मर्यादा निश्चित केली, तर त्या व्यक्तीला एका दिवसात त्यापेक्षा जास्त रक्कम पाठवता येणार नाही. बँकेची नियमित व्यवहार मर्यादा अधिक असली, तरी ग्राहकाने निश्चित केलेली मर्यादा लागू राहील.

याशिवाय, ग्राहकांना ठरावीक वेळेत डिजिटल पेमेंटची सुविधा बंद ठेवण्याचाही पर्याय मिळू शकतो.

डेबिट-क्रेडिट कार्डच्या वापरावरही नियंत्रण

नवीन डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्डच्या वापरासाठीही काही बदल प्रस्तावित आहेत. कार्ड जारी करताना ते सुरुवातीला भारतातील एटीएम आणि दुकानांमधील पेमेंट टर्मिनलवर वापरण्यासाठी सुरू असतील.

ऑनलाइन व्यवहार, संपर्कविरहित पेमेंट आणि परदेशातील व्यवहारांसाठी कार्डवरील सुविधा सुरुवातीला बंद ठेवण्याचा प्रस्ताव आहे. ग्राहकांना गरजेनुसार या सुविधा सुरू किंवा बंद करता येतील. तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी स्वतंत्र मर्यादाही निश्चित करता येईल. परकीय चलनातील प्रीपेड कार्डना मात्र या सुरुवातीच्या निर्बंधातून सूट असेल.

RBI New Rules : आता एका क्लिकवर थांबवता येणार डिजिटल पेमेंट; 'स्टॉप स्विच'सह आरबीआयचे नवे नियम, वाचा सविस्तर
ऑफिसमध्ये WhatsApp Web वापरताय? लॉगआउट न करताच निघू नका; गृह मंत्रालयाचा इशारा, वाचा सविस्तर

फसवणुकीचा संशय आल्यास 'स्टॉप स्विच'चा पर्याय

आरबीआयच्या प्रस्तावातील सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे 'स्टॉप स्विच'. या सुविधेच्या मदतीने ग्राहकाला आपल्या बँक खात्यातून पैसे बाहेर जाणारे स्वतः सुरू केलेले व्यवहार तातडीने थांबवता येतील.

'स्टॉप स्विच' सुरू केल्यानंतर ग्राहकाला नवीन डेबिट व्यवहार करता येणार नाहीत. तसेच नवीन पेमेंट मँडेट तयार करणे, नवीन स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देणे किंवा नव्या थर्ड पार्टी यूपीआय ॲपवर बँक खाते नोंदवणे शक्य होणार नाही.

मात्र, या सुविधेमुळे खात्यात पैसे जमा होण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजेच, खात्यात येणारी रक्कम स्वीकारता येईल. याशिवाय, आधीपासून सुरू असलेले नियमित पेमेंट मँडेट, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन, बँकेचे शुल्क आणि कर्जाचे हप्ते यांसारखे काही व्यवहार या सुविधेच्या कक्षेत येणार नाहीत. डिजिटल व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी ग्राहकाला बँकेकडे ओळख पडताळणी करावी लागेल.

RBI New Rules : आता एका क्लिकवर थांबवता येणार डिजिटल पेमेंट; 'स्टॉप स्विच'सह आरबीआयचे नवे नियम, वाचा सविस्तर
Instagram New Feature : स्टोरी पोस्ट करताना चूक झाली? टेन्शन नको! १५ मिनिटांत 'अशी' करा एडिट; जाणून घ्या सर्व प्रोसेस

मोठ्या व्यवहारांसाठी विश्वासू व्यक्तीची मंजुरी आवश्यक

डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी आरबीआयने 'ट्रस्टेड पर्सन मेकॅनिझम' (Trusted Person Mechanism) प्रस्तावित केले आहे. यानुसार, ग्राहकाला आपल्या विश्वासातील १८ वर्षांवरील एखाद्या व्यक्तीची निवड करता येईल. ग्राहकाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक रकमेच्या पात्र व्यवहारांसाठी या व्यक्तीची मंजुरी आवश्यक असेल.

अशा व्यवहाराची माहिती संबंधित विश्वासू व्यक्तीला पाठवली जाईल. त्यामध्ये व्यवहाराची रक्कम आणि पैसे कोणाला पाठवले जात आहेत, याचा तपशील असेल. त्यानंतर व्यवहाराला मंजुरी देण्यासाठी किंवा तो नाकारण्यासाठी एक तासाचा कालावधी मिळेल. या वेळेत मंजुरी मिळाली नाही किंवा व्यवहार नाकारला गेला, तर तो पूर्ण होणार नाही.

या सुविधेसाठी ग्राहक आणि निवडलेल्या व्यक्ती या दोघांचीही संमती आवश्यक असेल. मात्र, विश्वासू व्यक्तीला ग्राहकाच्या खात्यातील शिल्लक रक्कम, ठेवी किंवा इतर आर्थिक माहिती पाहता येणार नाही. तसेच तिला खाते चालवण्याचा किंवा स्वतंत्रपणे व्यवहार करण्याचा अधिकारही मिळणार नाही.

RBI New Rules : आता एका क्लिकवर थांबवता येणार डिजिटल पेमेंट; 'स्टॉप स्विच'सह आरबीआयचे नवे नियम, वाचा सविस्तर
UPI वापरणाऱ्या दुकानदारांसाठी खूशखबर! NPCI ने आणली शानदार स्कीम, कसा होणार फायदा? वाचा सविस्तर

महत्त्वाचे म्हणजे, यूपीआयद्वारे केलेले व्यवहार, व्यापाऱ्यांना केलेले पेमेंट आणि आधीपासून सुरू असलेले नियमित पेमेंट या व्यवस्थेतून वगळण्यात आले आहेत.

बँकेकडून चूक झाल्यास जबाबदारी निश्चित होणार

डिजिटल व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्यास बँकेची जबाबदारी नेमकी काय असेल, हे स्पष्ट करण्यासाठी आरबीआयने महत्त्वाचा प्रस्ताव मांडला आहे. यानुसार, ग्राहकांना डिजिटल व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याची सुविधा न देणे, त्यांनी ठरवलेल्या व्यवहार मर्यादेचे पालन न करणे, व्यवहारांचे अलर्ट न पाठवणे किंवा फसवणुकीची तक्रार मिळाल्यानंतरही वेळेत कारवाई न करणे, अशा गोष्टी बँकेची चूक मानल्या जाऊ शकतात.

तसेच बँकेच्या तांत्रिक यंत्रणेत बिघाड असणे, सुरक्षेतील त्रुटींमुळे फसवणूक होणे किंवा बँकेचे कर्मचारी आणि कंत्राटदार यांचा त्यात सहभाग असणे, अशा प्रकरणांमध्येही बँकेला जबाबदार धरले जाऊ शकते. म्हणजेच, डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी बँकेने आवश्यक ती काळजी घेतली नसेल, तर त्याची जबाबदारीही बँकेवर निश्चित होऊ शकते.

नवे नियम कधीपासून लागू होणार?

आरबीआयच्या प्रस्तावानुसार, बहुतांश नवीन तरतुदी १ जुलै २०२७ पासून लागू करण्याचे नियोजन आहे. मात्र, बँकांना त्यापूर्वीही या नियमांची अंमलबजावणी करता येईल. बँकांच्या निष्काळजीपणाच्या व्याख्येतील काही तरतुदी १ जानेवारी २०२७ पासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे.

हे नियम सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील व्यावसायिक बँकांना लागू होतील. मात्र, स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट्स बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि स्थानिक क्षेत्रीय बँकांना या प्रस्तावित नियमांतून वगळण्यात आले आहे. सध्या हे नियम मसुद्याच्या स्वरूपात असून, अंतिम निर्देशांनंतरच त्यांची अंमलबजावणी होईल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)