

व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सदस्य जोडताना १,०२४ ची मर्यादा संपली की नवीन ग्रुप तयार करण्याशिवाय पर्याय राहत नव्हता. मात्र, आता ही कटकट कमी होणार आहे. व्हॉट्सॲपने ग्रुपमधील सदस्यांची कमाल मर्यादा थेट १,५०० पर्यंत वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एकाच ग्रुपमध्ये आता तब्बल १,५०० जणांना सहभागी करता येणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी ॲडमिनला कोणत्याही सेटिंगमध्ये बदल करावा लागणार नाही. अँड्रॉइड आणि आयफोन युजर्सना हे अपडेट टप्प्याटप्प्याने मिळणार आहे.
अँड्रॉइड आणि आयफोनवर मिळणार सुविधा
व्हॉट्सॲपमधील नव्या बदलांची माहिती देणाऱ्या 'वाबेटाइन्फो' या संकेतस्थळाने सर्वप्रथम याबाबत वृत्त दिले. त्यानुसार, ग्रुपमधील सदस्यांची मर्यादा वाढवण्याची सुविधा अँड्रॉइड आणि आयओएस ( iOS) या दोन्ही प्रणालींवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकारचे स्मार्टफोन वापरणाऱ्या युजर्सना आता मोठ्या संख्येने सदस्य असलेले ग्रुप तयार करता येतील.
मात्र, हे अपडेट सर्वांना एकाच वेळी मिळणार नाही. व्हॉट्सॲपकडून ते टप्प्याटप्प्याने युजर्सच्या खात्यांपर्यंत पोहोचवले जात आहे. त्यामुळे काही युजर्सना ही सुविधा मिळाली असली, तरी इतरांना त्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.
ग्रुप ॲडमिनला कोणतेही सेटिंग बदलावे लागणार नाही
नव्या अपडेटमधील महत्त्वाची बाब म्हणजे, ग्रुपची सदस्यसंख्या वाढवण्यासाठी ॲडमिनला कोणतीही विशेष प्रक्रिया करावी लागणार नाही. व्हॉट्सॲपकडून ही सुविधा आधीपासून अस्तित्वात असलेल्या ग्रुपमध्येही आपोआप लागू केली जात आहे.
एखाद्या ग्रुपमध्ये आधीच १,०२४ सदस्य असतील, तर वाढीव मर्यादेचे अपडेट मिळाल्यानंतर त्यात आणखी ४७६ सदस्य जोडता येतील. म्हणजेच, जुन्या ग्रुपमधील सदस्यांना बाहेर काढण्याची किंवा नवीन ग्रुप तयार करण्याची गरज भासणार नाही.
व्हॉट्सॲप कम्युनिटीमधील ग्रुपनाही फायदा
सदस्यसंख्येची वाढीव मर्यादा केवळ सामान्य ग्रुपपुरती मर्यादित नसणार आहे. व्हॉट्सॲप कम्युनिटीजमधील स्वतंत्र ग्रुप चॅटसाठीही ही सुविधा लागू होणार आहे. त्यामुळे कम्युनिटी ॲडमिनना त्यांच्या ग्रुपमध्ये अधिक सदस्यांना सहभागी करून घेता येईल.
याआधीही अनेकदा वाढवली सदस्यांची मर्यादा
व्हॉट्सॲपने गेल्या काही वर्षांत ग्रुपमधील सदस्यांची कमाल मर्यादा टप्प्याटप्प्याने वाढवली आहे. २०१६ मध्ये ही मर्यादा १०० वरून २५६ सदस्यांपर्यंत करण्यात आली होती. त्यानंतर ती ५१२ पर्यंत वाढवण्यात आली. पुढे २०२२ मध्ये व्हॉट्सॲपने एका ग्रुपमध्ये १,०२४ सदस्यांना जोडण्याची सुविधा दिली. आता पुन्हा एकदा मोठा बदल करत ही मर्यादा १,५०० पर्यंत नेण्यात आली आहे.
ग्रुप व्यवस्थापनासाठी याआधीही आणल्या नव्या सुविधा
गेल्या महिन्यात व्हॉट्सॲपने ग्रुप व्यवस्थापन अधिक सोपे करण्यासाठी काही नवीन सुविधांची घोषणा केली होती. यामध्ये ग्रुपमधील महत्त्वाचे मेसेज पिन करून ठेवणे, स्टेटस अपडेट शेअर करणे, स्वतःचा उल्लेख असलेले मेसेज आणि उत्तरांच्या आधारे संभाषणे शोधणे अशा पर्यायांचा समावेश आहे.
याशिवाय, ग्रुपमध्ये नव्याने सहभागी होणाऱ्या सदस्यांसोबत अलीकडील मेसेजेसची हिस्ट्री शेअर करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे नवीन सदस्यांना ग्रुपमध्ये आधीपासून सुरू असलेल्या चर्चेची माहिती मिळण्यास मदत होते.
मोठ्या ग्रुपमध्ये दररोज शेकडो मेसेजेस येत असतात. अशा वेळी महत्त्वाचे मेसेज पिन करून ठेवल्यास ते पुन्हा शोधणे सोपे होते. त्यामुळे सदस्यांना संपूर्ण चॅट मागे जाऊन तपासण्याची गरज भासत नाही. एकूणच, सदस्यसंख्येची मर्यादा वाढवण्यासोबतच ग्रुपमधील संवाद आणि व्यवस्थापन अधिक सोपे करण्यावर व्हॉट्सॲपचा भर दिसत आहे.