FPJ
मुंबई

गोखले पुलाच्या गर्डरचे पुढचे पाऊल यशस्वी

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्‍या दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वेच्या भागात २५ मीटरपर्यंत सरकविण्याचे काम गुरुवारी पहाटेपर्यंत यशस्‍वीपणे पार पडले.

Swapnil S

मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्‍या दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वेच्या भागात २५ मीटरपर्यंत सरकविण्याचे काम गुरुवारी पहाटेपर्यंत यशस्‍वीपणे पार पडले. महाकाय अशी ही तुळई एकूण ८६ मीटर सरकविणे आवश्‍यक आहे. पश्चिम रेल्‍वे प्रशासनाच्‍या परवानगीनंतर तसेच पुढील रेल्‍वे 'ब्‍लॉक' मिळाल्‍यानंतर उर्वरित अंतरावर ही तुळई सरकविण्‍याचे काम हाती घेतले जाईल. त्‍यादृष्‍टीने महानगरपालिका प्रशासनाकडून पश्चिम रेल्वेसोबत समन्‍वय साधण्‍यात येत आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिम दिशेच्‍या वाहतुकीदरम्‍यान महत्त्वाचा दुवा असलेल्‍या गोखले पुलाच्या पहिल्‍या टप्‍प्‍यातील काम पूर्ण झाले आहे. पुलाचा हा भाग नागरिकांसाठी २६ फेब्रुवारी २०२४ पासून खुला केला आहे. त्‍यावरून हलक्‍या वाहनांना प्रवेश देण्‍यात आला आहे. आता या पूल उभारणीतील महत्त्वाचा टप्पा म्‍हणजे दुसरी तुळई स्थापन करण्याचे काम सुरू करण्‍यात आले आहे. याचाच एक भाग म्‍हणून बुधवारी, ४ सप्‍टेंबर रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते गुरुवारी पहाटे ५ वाजेपर्यंत ही तुळई रेल्‍वे भागावर २५ मीटरपर्यंत सरकविण्‍याचे काम पूर्ण करण्‍यात आले.

महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्‍या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍या निर्देशानुसार महानगरपालिकेच्‍या पूल विभागाने पश्चिम रेल्‍वे प्रशासनासोबत समन्‍वय साधून ही कार्यवाही पूर्ण केली. प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते यांच्‍यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी नियोजन करून तुळई सरकविण्‍याचे काम यशस्वी केले.

पहिल्‍या टप्‍प्‍याप्रमाणेच दुसऱ्या टप्‍प्‍यातील लोखंडी तुळईची जुळवणी रेल्‍वे रुळाच्‍या पूर्व बाजूस जमिनीपासून १४ ते १५ मीटर उंचीवर पूर्ण करण्‍यात आली. ही तुळई पूर्णपणे सरकविल्‍यानंतर १४ ते १५ मीटर उंचीवरून ७.५ मीटर पातळीपर्यंत खाली आणण्‍याचे काम पूर्ण करण्‍यात येईल. रस्‍ता रेषेमध्‍ये तुळई स्थापन झाल्यानंतर क्रॅश बॅरिअर, डांबरीकरण, पोहच रस्त्यांची कामे, पथदिवे, मार्गिकांचे रंगकाम अशी विविध कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

दुसरी तुळई रेल्‍वे भागावर सरकविण्‍याच्‍या अनुषंगाने रेल्‍वे मंत्रालया अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्‍या मेसर्स राईट्स लिमिटेड यांच्‍यामार्फत तसेच पश्चिम रेल्‍वेच्‍या अधिकाऱ्यांमार्फत तांत्रिक तपासणी करण्‍यात आली आहे. तुळई पुढे सरकविण्‍याचे कामकाज देखील पश्चिम रेल्‍वे प्राधिकरणाच्‍या परवानगीनंतर करण्‍यात येणार आहे.

अत्यंत आव्हानात्मक काम

गोखले पुलासाठी तुळई स्थापित करणे हे अभियांत्रिकीदृष्ट्या अत्यंत आव्हानात्‍मक असे काम आहे. पश्चिम रेल्‍वे प्राधिकरणाने मंजूर केलेल्‍या आराखड्यानुसार आणि पश्चिम रेल्‍वेने निर्देश केल्‍याप्रमाणे मेसर्स राइट्स लिमिटेड यांच्‍या तांत्रिक पर्यवेक्षणांतर्गत हे काम प्रगतिपथावर आहे. रेल्‍वे सुरक्षिततेच्‍या दृष्‍टिकोनातून कामाची जोखीम आणि तांत्रिक बाबी तपासून, त्‍याचप्रमाणे रेल्‍वे वाहतूक व वीजपुरवठा या दोन्‍ही घटकांमध्ये खंड (ब्लॉक) मिळाल्‍यानंतर तुळई स्‍थापनेचे कामकाज केले जाते. एकूण ८६ मीटर पैकी प्रारंभिक २५ मीटर अंतरावर तुळई सरकविणे आव्‍हानात्‍मक होते. ते यशस्‍वी झाल्‍याने आता उर्वरित अंतरावर तुळई सरकविणे तुलनेने सुलभतेने करता येणार आहे. त्‍यासाठी पश्चिम रेल्‍वेबरोबर सातत्‍याने समन्‍वय राखला जात आहे, असे पालिकेने स्पष्ट केले.

१३.५ मीटर रूंद आणि ९० मीटर लांब तुळई

पुलाच्या दुसऱ्या बाजूच्‍या तुळईचे सर्व सुट्टे भाग अंबाला येथील फॅब्रिकेशन प्रकल्‍पातून मुंबईत आणण्‍यात आले आहेत. या सुट्ट्या भागांच्या जोडणीचे काम २४ ऑगस्‍ट २०२४ रोजी पूर्ण झाले. प्रत्‍येक तुळईचे माप एक मीटर रुंदीच्‍या पदपथासह १३.५ मीटर रूंद (३ अधिक ३ मार्गिका) आणि लांबी ९० मीटर आहे. तुळईचे वजन सुमारे १३०० मेट्रिक टन इतके आहे. तुळईच्‍या सुट्ट्या भागाची कार्यस्‍थळावर जुळवणी तसेच रेल्‍वे भागावर स्‍थानापन्‍न करण्‍यासाठी प्रकल्‍पस्‍थळी उपलब्‍ध कमी जागा या बाबी लक्षात घेता ३६० अंशामध्‍ये फिरणाऱ्या अवजड क्रेनचा उपयोग करण्‍यात आला आहे.

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२