जन्मदाखल्यात बदल करण्याचा पालिकेला अधिकार; विश्वासार्ह पुराव्यांची आवश्यकता -हायकोर्ट 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

जन्मदाखल्यात बदल करण्याचा पालिकेला अधिकार; विश्वासार्ह पुराव्यांची आवश्यकता - हायकोर्ट

मुलाच्या अथवा मुलीच्या जन्मदाखल्यातील नोंद चुकीची असल्याचे विश्वासार्ह पुराव्यांद्वारे सिद्ध झाल्यास ती दुरुस्त करण्याचा अधिकार पालिका प्रशासनाला आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा हायकोर्टाने दिला.

Swapnil S

मुंबई : मुलाच्या अथवा मुलीच्या जन्मदाखल्यातील नोंद चुकीची असल्याचे विश्वासार्ह पुराव्यांद्वारे सिद्ध झाल्यास ती दुरुस्त करण्याचा अधिकार पालिका प्रशासनाला आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा हायकोर्टाने दिला.

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा देताना एका अल्पवयीन मुलीच्या जन्मदाखल्यातील वडिलांचे नाव बदलून तिच्या जैविक वडिलांचे नाव नोंदविण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले.

याचिकाकर्त्या महिलेचे २००६ मध्ये पहिले लग्न झाले होते. मात्र काही काळाने पती-पत्नीमध्ये मतभेद झाल्यामुळे ते वेगळे राहू लागले. दरम्यानच्या काळात महिलेचे दुसऱ्या एका व्यक्तीसोबत संबंध निर्माण झाले आणि २००९ मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला.

मुलगी जन्माला आली तेव्हा महिलेचा घटस्फोट न झाल्याने पहिला विवाह कायद्याने कायम होता. त्यामुळे नियमानुसार जन्म दाखल्यात वडिलांच्या जागी तिच्या पहिल्या पतीचे नाव नोंदविण्यात आले. त्यानंतर पहिल्या पतीसोबत अधिकृत घटस्फोट झाल्यानंतर महिलेने मुलीच्या जैविक वडिलांशी रितसर विवाह केला आणि दोघांनी संयुक्तपणे मुंबई पालिकेकडे जन्मतारखेतील वडिलांचे नाव दुरुस्त करण्याची मागणी केली.

मात्र पालिकेने नकार दिला. अखेर महिलेने ज्येष्ठ वकील उदय वारुंजीकर, ॲड आदित्य खारकर, ॲड जिनेश जैन यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल करून जन्मदाखल्यातून पहिल्या पतीचे नाव काढून टाकून मुलीच्या जैविक वडिलांचे नाव नोंदविण्याचे निर्देश महापालिकेला द्यावेत, तसेच मुलीच्या जन्माशी संबंधित नोंदी गोपनीय ठेवाव्यात, अशी मागणी करत याचिका दाखल केली.

सुधारित जन्मदाखला ३० दिवसांच्या आत जारी करा

या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकेसोबत सादर केलेल्या डीएनए पितृत्व चाचणीत संबंधित कागदपत्रे आईने शपथपत्राद्वारे पहिला पती मुलीचा जैविक पिता नसल्याचे स्पष्ट केले. तर दुसऱ्या व्यक्तीने स्वतः जैविक पिता असल्याचे मान्य केले. याची दखल घेत खंडपीठाने जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ मधील कलम-१५ चा संदर्भ देत, पुरेसा आणि विश्वासार्ह पुरावा उपलब्ध असल्यास जन्मदाखल्यातील चुकीची नोंद दुरुस्त करता येते, असे स्पष्ट करत याचिका मंजूर करून मुलीच्या जन्मदाखल्यातून आधीच्या पतीचे नाव वगळून जैविक वडिलांचे नाव नोंदविण्याचे आदेश पालिकेला दिले. तसेच सुधारित जन्मदाखला ३० दिवसांच्या आत जारी करण्याचे निकालात स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती