मुंबई : ॲप आधारित कॅब चालकांच्या संपाला सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दैनंदिन उत्पन्नावर घर चालवणाऱ्या चालकांना संपाची झळ बसू लागल्याने अप आधारित रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांनी चार दिवसांपासून सुरू असलेला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपर्यंत आरटीओने सकारात्मक निर्णय न घेतल्यास, बुधवारपासून पुन्हा संप सुरू करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र कामगार सभा या संघटनेद्वारे दिला आहे.
ओला, उबरसारख्या ॲप आधारित टॅक्सी चालकांना प्रतिकिमी ८ ते १२ रुपये भाडे दिले जात होते. त्यामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित केलेले दर सर्व अप आधारित सेवेसाठी लागू केले जावे, अशी मागणी राज्यभरातील चालकांद्वारे केली जात होती. यासाठी सीएसएमटीजवळील आझाद मैदानात संप आणि अनिश्चित कालावधीसाठी उपोषण सुरू होते. परंतु, या संपाला संमिश्र प्रतिसाद मागण्यांबाबत आरटीओ विचार करून मंगळवारपर्यंत निर्णय घेणार आहे. आरटीओने मागण्यांबाबत विचार करण्यासाठी मंगळवारपर्यंत वेळ मागितला. मात्र, चालक वर्गाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्याला गाडी चालवणे आवश्यक आहे. त्याच्या गाडीचे चाक थांबल्यास, त्यांचे घर रस्त्यावर येईल. त्यामुळे संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, मंगळवारी मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा संप सुरू केला जाईल, असा इशारा दिला आहे.
चालकांच्या प्रमुख मागण्या
चालकांच्या प्रमुख मागण्यापैकी एक म्हणजे, प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित केलेले दर सर्व ॲप आधारित सेवेसाठी लागू केले जावेत.
अनिश्चित भाडेदरामुळे चालकांना दैनंदिन गरजा भागवणे कठीण जात आहे. त्यामुळे आरटीओने निश्चित केलेल्या दरानुसार, भाडे ठरवावे, अशी चालकांनी मागणी केली.