उपनगरीय रेल्वेमार्गावरील रेल्वे वाहतूक पावसाळ्याच्या दिवसांत विविध तांत्रिक कारणांमुळे विस्कळीत होते. रेल्वेमार्गावरील विविध ठिकाणी सुरक्षेबाबत पावले उचलताना मध्य रेल्वेने अतिधोकादायक तसेच धोकादायक अशी विभागणी करत ५२ विभाग निवडले आहेत. यापैकी ३४ विभाग मुंबईतील घाट विभागात असून या सर्व ठिकाणी प्रशासनाकडून तब्बल ३०० रेल्वे कर्मचाऱ्यांना गस्तीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
यासाठी सर्व गस्ती घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीपीएस ट्रॅकर देण्यात आले असून त्यांच्या लाईव्ह लोकेशनवर संबंधित नियंत्रण कक्षामधून लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
मध्य रेल्वे मार्गावर विविध मान्सूनपूर्व कामे सुरू असतानाच लांब पल्ल्यांच्या गाड्या येण्या-जाण्याच्या मार्गावर म्हणजेच घाट परिसरात विविध मान्सून कामांवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पावसाळ्याच्या दिवसात रुळाखालून माती वाहून जाणे, दरड कोसळणे या अचानक घडणाऱ्या घटनांमुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते. याशिवाय जीवित आणि वित्तहानीची शक्यतादेखील उद्भवते. या सर्व घटना टाळण्यासाठी यंदा प्रशासनाने विविध तांत्रिक कामांवर तसेच मुख्य ठिकाणी अधिकची सुरक्षा म्हणून अनेक उपाययोजना राबवल्या आहेत.