मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि चैत्यभूमी परिसरात येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांकडून केल जाणारा कचरा ताबडतोब उचलण्यासाठी काही सामाजिक संस्था पुढे आल्या होत्या. नेरळ वरून आलेल्या आम्ही आंबेडकरवादी या संस्थेने ५०० पेक्षा अधिक स्वयंसेवक तैनात करून कचरा उचलण्याचे काम केले.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसर आणि चैत्यभूमी परिसरात येणाऱ्या अनुयायांकडून जेवणाचे पॅकेट्स, प्लास्टिकच्या बाटल्या आणि अन्य खाद्यपदार्थांचे प्लास्टिक कागद तसेच उरलेले अन्न पदार्थ यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा होतो. हा कचरा रस्त्यावर आणि परिसरात पडतो. रस्त्यावर कचरा टाकू नये असे फलक घेतलेले आम्ही आंबेडकरवादी या संघटनेचे कार्यकर्ते परिसरात जागोजागी दिसत होते. तसेच मोठ्या पिशव्या घेऊन पडलेला कचरा स्वतः हे कार्यकर्ते उचलताना दिसत होते. ओला आणि सुका कचरा वेगळा करून वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरत होते. यासंदर्भात बोलताना संघटनेचे कार्यकर्ते आदेश गायकवाड यांनी सांगितले की, आम्ही कर्जत नेरळ वरून आलो असून आमची नऊ जणांची टीम आहे. अशा ५० टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. मी स्वतः पॅथॉलॉजिस्ट आहे. अनुयायांकडून कळत नकळत होणारा कचरा परिसराची दुर्गंधी वाढवतो बकालपणा वाढवतो आणि आरोग्याला हानिकारक ठरतो म्हणून तो योग्य वेळी उचलला जावा यासाठी आमचा प्रयत्न असतो.
परिवर्तनवादी विचारांची कलापथके
चैत्यभूमी परिसरात परिवर्तनवादी विचारांची कलापथके रस्त्यावर डफ, चाळ वाजवत अनुयायांचे लक्ष वेधत होते. नव समाजवादी पर्याय या संघटनेचे कार्यकर्ते कलावंत रॅप च्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करत होते. नव्या पिढीला आता शाहिरी आणि चळवळी गाण्यांपेक्षा रॅप जवळचे वाटत असल्याने रॅपच्या माध्यमातून आम्ही या पिढीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहोत असे सुनील मनवर सांगतात. तर सांगाल का, आमचा गुन्हा तरी काय? तरुणांच्या हाताला रोजगार का नाय? अशा आशयाची गीते गात होते. तर सत्यशोधक डेमोक्रेटिक पार्टी या संघटनेचे कार्यकर्ते चाळ आणि डफाच्या तालावर वामनदादा कर्डक यांची शाहिरी आणि चळवलीतली गाणी गात होते. याला भीम अनुयायांकडून प्रतिसाद मिळत होता.