प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

महाविद्यालयांना नियमबाह्य प्रवेश भोवणार; विद्यार्थ्यांच्या प्रवेशांमध्ये त्रुटी आढळल्यास होणार लाखोंचा दंड

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम वर्ष पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी नियमित पद्धतीने प्रवेश अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा विद्यापीठाने दिला आहे. त्यानुसार लाखो रुपयांचा दंड तसेच प्रवेश क्षमतेत कपात करण्याचा ठराव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी सलग्न महाविद्यालये, संस्था तसेच स्वायत्त महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या नियमबाह्य प्रवेशावर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम वर्ष पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी नियमित पद्धतीने प्रवेश अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा विद्यापीठाने दिला आहे. त्यानुसार लाखो रुपयांचा दंड तसेच प्रवेश क्षमतेत कपात करण्याचा ठराव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

काही महाविद्यालये नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. हे प्रकार रोखण्यासाठी विद्यापीठाने कठोर भूमिका घेतली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर ठरावानुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशांमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई, प्रवेश क्षमतेत कपात आणि गरज भासल्यास चौकशी समिती नियुक्त करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

त्रुटी आढळल्यास दोन लाखांचा दंड

१ ते ५ विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रकरणांत त्रुटी आढळल्यास संबंधित महाविद्यालयावर २ लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. शुल्काच्या दुप्पट रकमेची अतिरिक्त दंडात्मक आकारणी, तर विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे ५ हजारांचा दंड भरावा लागेल.

नियमभंग केल्यास पाच लाखांचा दंड

महाविद्यालयांनी ६ ते २० विद्यार्थ्यांच्या प्रवेशांमध्ये नियमभंग केल्यास ५ लाख दंड आणि प्रति विद्यार्थ्याच्या शिक्षण शुल्काच्या दुप्पट रकमेची दंडात्मक आकारणी करण्यात येणार आहे.

गंभीर त्रुटी १० लाख

२१ ते ४० विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रकरणांतील गंभीर त्रुटींच्या बाबतीत महाविद्यालयाला १० लाखांचा दंड, प्रत्येक विद्यार्थ्याच्या शुल्काच्या दुप्पट रकमेची दंडात्मक आकारणी करण्यात येईल. याशिवाय शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश क्षमतेत २५ टक्के कपात करण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.

शुल्काच्या तिप्पट दंड

४१ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या प्रवेशांत नियमभंग आढळल्यास हे प्रकरण अत्यंत गंभीर मानले जाणार आहे. अशा वेळी महाविद्यालयावर १० लाख रुपयांचा दंड तसेच प्रति विद्यार्थ्याच्या शिक्षण शुल्काच्या तिप्पट रकमेची दंडात्मक आकारणी करण्यात येईल. यासोबत २०२६-२७ पासून प्रवेश क्षमतेत २५ टक्के कपात करून समितीमार्फत सखोल तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ५ हजारांचा दंड भरावा लागणार आहे.

तिसऱ्यांदा नियमभंग झाल्यास प्रवेश रद्द होणार

महाविद्यालयांची अशा प्रकारची चूक दुसऱ्यांदा आढळल्यास शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मध्ये संबंधित महाविद्यालयाची प्रवेश क्षमता थेट ५० टक्क्यांनी कमी करण्यात येईल. तिसऱ्यांदा नियमभंग आढळल्यास त्या वर्षासाठी प्रवेश क्षमता पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेत शिस्त आणि पारदर्शकता वाढेल तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांना यापुढे सवलत दिली जाणार नसल्याचा ठाम संदेश विद्यापीठाने दिला आहे.

१५ जानेवारीला मतदानासाठी सुट्टी, सवलत नाही? 'या' क्रमांकावर साधा संपर्क

Navi Mumbai Election : "... अन्यथा नाईकांचा 'टांगा' कुठे फरार होईल कळणार नाही", शंभूराज देसाई यांचा इशारा

'लाडकी बहीण'चे पैसे निवडणुकीनंतरच द्या! काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

KDMC Election : पहिल्याच दिवशी ३११ कर्मचाऱ्यांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क

BMC Election : मुंबई फक्त राजकीय आखाडाच आहे का?