मुंबई : मुंबईतील सर्वात वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर गुरुवारी रात्री पुनर्विकासाचे काम सुरू असताना, तिकीट खिडकीच्या (बुकिंग हॉल) प्रवेशद्वारी सिलिंगचा (छताचा) काही भाग कोसळून दोन प्रवासी जखमी झाले. या दुर्घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आणि ऐतिहासिक स्थानकावरील बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाअंतर्गत (आरएलडीए) सुरू असलेल्या या कामादरम्यान ही घटना २२ ऑक्टोबरला रात्री १० वाजून ५ मिनिटांच्या सुमाराला घडली. जखमी प्रवाशांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे स्थानकाच्या पुनर्विकास स्थळावरील सुरक्षिततेच्या व्यवस्थेवर विशेषतः जिथे बांधकाम सुरू आहे अशा भागातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सीएसएमटी स्थानकावर दररोज उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे अपघातांना टळण्यासाठी बांधकाम क्षेत्रांचे व्यवस्थापन अतिशय काटेकोर असणे गरजेचे आहे. वर्दळीच्या प्रवेशद्वाराजवळ छताचा भाग कोसळल्यामुळे संबंधित परिसर सुरक्षित केला होता का आणि कामादरम्यान ती रचना स्थिर होती का, याबाबतही शंका उपस्थित होत आहेत.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांची ओळख विनायक हाटकर (२८) आणि अयान मातवणकर (२४) अशी पटली आहे. विनायक हाटकर यांच्या उजव्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना टाके घालावे लागले तर अयान मातवणकर यांच्या डोक्याला मार लागला आहे. या परिसरातील पुनर्विकासाचे कंत्राट 'अहलुवालिया' या कंपनीकडे आहे.
कारणांचा घेणार शोध
छताचा भाग कोसळण्याचे नेमके कारण काय होते आणि पुनर्विकासाचे काम सुरू करण्यापूर्वी व दरम्यान पुरेशा सुरक्षिततेच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या का, याचा शोध घेणे आता तातडीचे ठरले आहे. या घटनेने चालू असलेल्या रेल्वे स्थानकांवर बांधकाम करताना प्रवाशांना कोणत्याही टाळता येण्यासारख्या धोक्याला सामोरे जावे लागणार नाही, याची खात्री करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.