मुंबई : दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या बाह्य चित्रीकरणासाठी मुंबईतील मानखुर्द येथील सुमारे १४ एकर शासकीय जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला देण्यास महसूल विभागाने मान्यता दिल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिली.
मानखुर्द (ता. कुर्ला) येथील सर्व्हे क्रमांक १३८ पैकी तसेच लगतच्या मिळकतीतील अंदाजे १४ एकर म्हणजेच सुमारे ५६ हजार ६६६ चौ.मी. जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला बाह्य चित्रीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जमीन महाराष्ट्र जमीन महसूल जमीन संहिता, १९६६ मधील कलम ४० नुसार प्राप्त अधिकारात महसूलमुक्त आणि भोगाधिकार मूल्यरहित किमतीने देण्यास सरकारने मान्यता दिली आहे.
महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीला आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. दादासाहेब फाळके यांच्या नावाने असलेल्या चित्रनगरीच्या विकासाकरिता बाह्य चित्रिकरणासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देताना शासनाने सार्वजनिक हित आणि जमिनीचा नियोजनबद्ध वापर यांचा समतोल साधल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.