मुंबई : 'मच गया शोर सारी नगरी रे', 'गो गो गो गोविंदा', 'तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा', 'ढाक्कुमाक्कुम' अशा संगीतमय व भारावलेल्या वातावरणात शनिवारी दहीहंडीचा उत्सव पार पडला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांनी उंच मानवी मनोरे रचत मोठमोठ्या बक्षीस रकमांचा 'काला' घशात घातला. आतापर्यंत मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि आसपासच्या भागात नऊ थरांचा विक्रम जयजवान गोविंदा पथकाच्या नावावर होता. मात्र जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने शनिवारी सकाळी ठाण्याच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीत १० थरांचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. त्यानंतर कोकण नगर पथकाला संस्कृतीचे आयोजक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. त्यानंतर काही तासांनीच जयजवान गोविंदा पथकानेही घाटकोपरमध्ये १० थर लावले.
यंदा महापालिकांच्या निवडणुका असल्यामुळे राजकीय नेतेमंडळींकडून मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आदी ठिकाणी मोठमोठ्या बक्षीस रकमांच्या दहीहंडीचे जबरदस्त आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात सेलिब्रिटी, नेतेमंडळींनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावल्याने गोविंदांचा उत्साह द्विगुणित झाला. त्यातच विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने दहीहंडीला हजेरी लावल्याने गोविंदाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. 'गो गो गोविंदा', 'मटकी फोडे ब्रिजबाला', 'गोविंदा रे गोपाळा' अशा गाण्यांवर मुंबई थिरकली.
दरम्यान, अनेक ठिकाणी चित्तथरारक सात, आठ, नऊ तसेच १० थरांवर थर लागले. उंच उंच थर लावून मटकी फोडणाऱ्या गोविंदांसाठी असलेली लाखोंची बक्षिसांची लयलूट झाली. एकूणच यंदा मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहिहंडी उत्सवात निवडणुकीचा जागर अधिक होता.
वरळीतील जांभोरी मैदानात परिवर्तन दहिहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांसह मंत्री नेते मंडळींनी हजेरी लावली. घाटकोपर येथील राम कदम यांच्या दहिहंडी उत्सवात सिनेकलाकार जितेंद्र, जया प्रदा, मागोठण्यात प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या दहिहंडी उत्सवात गौतमी पाटील यांसह अन्य सेलिब्रिटींची उपस्थिती गोविदांसह उपस्थितांचे आकर्षण ठरली.
दहिहंडी उत्सवात मटकी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये उंच उंच थर रचण्याची शर्यतच लागली होती. मुंबईत जवळपास १,५०० दहिहंडी उत्सव मंडळे असून मुंबईसह ठाण्यातील विविध ठिकाणच्या दहिहंडी फोडण्यासाठी गोविंदा पोहोचले. उंच उंच थर लावून काही गोविदांनी सलामी दिली. गोविदांचा उत्साह वाढावा, यासाठी सेलिब्रिटींनी दहिहंडी उत्सव मंडळात हजेरी लावल्याने गोविदांसह मुंबईकरांनी आनंद लुटला. तसेच विविध गाण्याच्या तालावर गोविदांसह मुंबईकर ही थीरकले.
मुंबईभरात ठिकठिकाणी दहीहंडी बांधण्यात आल्या. काळाचौकी, लालबाग, परळ, दादर, वरळी, घाटकोपर, फोर्ट, चेंबूर, जोगेश्वरी आदी ठिकाणी एकावर एक असे चित्तथराराक मानवी मनोरे रचून हंडी फोडण्याचा प्रयत्न झाला. बहुतांश ठिकाणच्या आयोजकांनी हंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी सेफ्टी गिअर, जमिनीवर गाद्या, हारनेस्ट आणि रुग्णवाहिकांची सोय केली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या उत्सवात राजकीय नेत्यांचा सहभाग लक्ष वेधून घेणारा होता.
जय जवान गोविंदा पथकाने गेली काही वर्षे रचलेला ९ थरांचा विक्रम अद्याप अबाधित होता. जय जवान, कोकण नगर आणि आर्यन्स गोविंदा पथकाने शनिवारी ९ थर लावल्यामुळे यंदा हा विक्रम मोडणार, याची झलक दाखवून दिली होती. पण १२ वाजताच्या सुमारास जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने ठाण्यातील संस्कृतीच्या दहिहंडीत सर्वप्रथम १० थर लावत हा विक्रम आपल्या नावावर केला. सरनाईक यांनी त्यांना २५ लाखांचे बक्षीस जाहीर केल्याने, कोकण नगर गोविंदा पथकाचा आनंद गगनाला भिडला होता. त्यानंतर घाटकोपर येथे मनसे नेते गणेश चुक्कल, अरविंद गिते मित्र परिवार आयोजित दहिहंडीमध्ये जय जवान गोविंदा पथकाने तब्बल १० थरांची दहीहंडी रचले, शिवाय दिवसभरात अजून दोन वेळेस १० थर रचत हॅटट्रीक साधून सर्वांनाच थक्क केले.
परंपरेला फाटा, उत्सवाला बाजारू हिणकस स्वरूप
दहीहंडी उत्सवात आता 'काला' चोरण्याऐवजी लाखो रूपयांची बक्षिसे जिंकण्याकडे गोविंदा पथकांचा कल वाढू लागला आहे. आयोजकांकडून यंदा मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. अनेक ठिकाणी कर्णकर्कश आवाजात डीजे, नृत्यांगनांना स्थान देण्यात आले. गोपाळकालाच्या परंपरेला फाटा देत काही आयोजकांनी या उत्सवाला बाजारू, हिणकस स्वरूप दिल्याचे दिसून येत होते.
कोकण नगर पथकाला २५ लाखांचे इनाम
विश्वविक्रम रचणारे जोगेश्वरी येथील कोकण नगरचे गोविंदा पथक हे आपल्या शिस्तबद्ध पद्धतीसाठी ओळखले जाते. विवेक कोचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली है पथक गेल्या १२ वर्षांपासून उंच मनोरे रचत आहे. याआधी ९ थर लावल्यानंतर त्यांनी ठाण्यात १० थरांचा विश्वविक्रम रचला. त्यानंतर संस्कृती युवा प्रतिष्ठानचे आयोजक प्रताप सरनाईक यांनी या मंडळाला २५ लाख रुपयांचे इनाम जाहीर केले.