मुंबईच्या उत्तरेकडील दहिसर टोलनाक्यावर रोजच्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा त्रास वाढत आहे. रुग्णवाहिका, स्कूल बस आणि अत्यावश्यक सेवा देखील या गर्दीमुळे अडथळ्यात येत आहेत. यामुळे प्रदूषण वाढत आहे आणि प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया जात आहे. यावर उपाय म्हणून वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित टोल संकलन प्रणाली सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
या यंत्रणेच्या माध्यमातून टोल भरण्याची प्रक्रिया जलद होणार असून, त्यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि टोलनाका स्थलांतरित न करता देखील वाहतूक सुरळीत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, भारतीय राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, मिरा-भाईंदर पोलीस आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत टोलनाक्यावरील AI प्रणालीच्या अंमलबजावणीसंबंधी तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीत हा टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे हा पर्याय सध्या शक्य नसल्याने AI आधारित टोल संकलन प्रणाली सुरू करण्याचा प्रस्ताव सरनाईक यांनी सादर केला आहे.
यासोबतच पेणकर फाटा आणि सिग्नल परिसरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी तसेच दिल्ली दरबार हॉटेल ते दहिसर टोलनाका या मार्गावरील रस्ते रुंदीकरणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.