धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून लोकाभिमुख नागरी वसाहतींची पायाभरणी केली जात आहे.  
मुंबई

धारावीत सापडेल स्वातंत्र्याचा नवा अर्थ

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून लोकाभिमुख नागरी वसाहतींची पायाभरणी केली जात आहे. सन्मान, उपजीविका, संधी आणि पर्यावरण हे एकत्रितपणे वृद्धिंगत होण्याचा योग यामुळे जुळून येईल.

Swapnil S

सन्मानातून स्वातंत्र्य

डॉ. महेंद्र कल्याणकर

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून लोकाभिमुख नागरी वसाहतींची पायाभरणी केली जात आहे. सन्मान, उपजीविका, संधी आणि पर्यावरण हे एकत्रितपणे वृद्धिंगत होण्याचा योग यामुळे जुळून येईल.

धारावी पुनर्विकास प्रकल्प ही केवळ एखादी नागरी पुनर्विकास योजना नाही. धारावीतील १० लाखांहून अधिक नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पासारखे अवाढव्य आणि गुंतागुंतीचे फारच थोडे प्रकल्प देशात इतरत्रा आढळून येतील. कारण यात केवळ नागरी पुनर्विकास नव्हे, तर सामाजिक परिवर्तनही अंतर्भूत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आवाका अभूतपूर्व आहेच, पण खरी कसोटी येथील नागरिकांच्या जीवनमान बदलात दिसून येईल.

कारण धारावीतील पुनर्विकास निव्वळ नव्या इमारतींच्या उभारणीपलीकडे बरेच काही देणारा ठरतो. उपजीविका, शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक ठिकाणे आणि पुढील पिढ्यांसाठी संधींची निर्मिती या घटकांनाही समान महत्त्व दिले जात आहे.

हीच भूमिका धारावी सामाजिक अभियानातही प्रतिबिंबित होते. हे अभियान पुनर्विकास प्रकल्पाचा महत्त्वाचा घटक ठरू लागले आहे. याअंतर्गत उपजीविका आणि कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात हजारो रहिवासी नोंदणीकृत झाले आहेत. रोजगाराभिमुखता सुधारणे आणि उत्पन्नवाढीच्या नवीन संधी उपलब्ध करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. स्वयंरोजगार आणि उद्यमशीलताकेंद्री कार्यक्रमांद्वारे महिलांना पाठबळ दिले जात आहे. तर शिक्षण, आरोग्य, पोषण, जीवनोपयोगी कौशल्ये आणि वैयक्तिक सुरक्षाकेंद्र कार्यक्रमांचा फायदा लहान मुले आणि युवा वर्गाला होत आहे. रोजगार भागीदारी, आरोग्य शिबिरे, संपर्क उपक्रमांच्या माध्यमातून कुटुंबांना सरकारी कल्याणकारी योजनांशी आणि अत्यावश्यक सेवांशी संलग्न करण्याची मोहीमही सुरू आहे. पुनर्विकास हा लोकांपासून सुरू होतो या तत्त्वाशी प्रामाणिक राहून, भौतिक विकासाला सामाजिक विकासाची जोड दिली जात आहे.

धारावीवासियांचा पुढाकार

या प्रकल्पाला धारावीच्या रहिवाशांकडून मिळणारा पाठिंबा सर्वाधिक भक्कम आहे. बहुतांश कुटुंबे स्वतःहून करारावर स्वाक्षऱ्या करत आहेत, शांततापूर्ण मार्गाने घरे सुपूर्द करत आहेत, जेणेकरून बांधकामाला सुरुवात व्हावी. लवकरात लवकर नवीन घरात प्रवेश घेता यावा, या आशेने जुन्या घराच्या बाहेर पडत आहेत. शेकडो जण यापूर्वीच संक्रमण निवासांमध्ये दाखल झाले आहेत. यांतील अनेकजण तेथील स्वच्छ परिसर, चांगल्या नागरी सुविधा आणि सुधारित जीवनमानाचे दाखले देतात. त्यांना स्वतःच्या कायम घराच्या चाव्या केव्हा हाती पडतात याची आस लागली आहे. पुनर्विकास हे केवळ दूरचे स्वप्न नाही, तर आजूबाजूला घडणारे वास्तव आहे हेच त्यांच्या आत्मविश्वासातून प्रतिबिंबित होते.

सर्वेक्षण प्रक्रियेतही याच स्वरूपाचा आत्मविश्वास दिसून येतो. ज्या वस्त्यांमध्ये याआधी शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या -विशेषतः कुंभारवाडा आणि कंपाउंड १३ येथील काही भागांत - तेथील मंडळी गृह सर्वेक्षण आणि क्रमांकनाच्या कार्यात सहकार्य करत आहेत. जवळपास ९१ हजारांहून अधिक कुटुंबांनी गृह सर्वेक्षण पूर्ण केले असून, ते आता पुनर्वसन घरांच्या प्रतीक्षेत आहेत.

संमिश्र विनियोग परिसर

धारावीमध्ये भविष्यातील वसाहत आकाराला येत आहे. धारावीचा पुनर्विकास संमिश्र विनियोग, स्वयंपूर्ण परिसर म्हणून केला जात आहे. या रचनेत घरे, कार्यालयीन ठिकाणे, दुकाने, शाळा, रुग्णालये, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, उद्याने, सार्वजनिक सुविधा एकत्रितपणे उपलब्ध असतात. धारावीच्या निवास-रोजगार संस्कृतीचे जतन करतानाच, अधिक चांगली घरे, अधिक चांगल्या पायाभूत सुविधा आणि अधिक चांगले जीवनमान पुरवणे असा प्रयत्न आहे. तो अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यासाठी लवकरच धारावी एक्सपिरियन्स सेंटर सुरू होत आहे. यातून घरांचे प्रारूप आणि पुनर्विकास प्रक्रिया समजावून सांगितल्या जातील.

केवळ अधिक उंच इमारती बांधणे हा उद्देश नाही. सुटसुटीत, सुनियोजित संमिश्र विनियोग परिसराची उभारणी यातून केली जाईल. असा परिसर जेथे लोक राहतील, काम करतील आणि समृद्ध होतील.

हे करत असताना धारावीला ओळख देणाऱ्या सामुदायिक बंधांची वीण उसवली जाणार नाही, हे सुनिश्चित केले जाईल. हे साधण्यासाठी पुनर्वसन इमारती आणि वसाहतींची संरचना करण्याच्या मोहिमेत सासाकी, बुरो हॅपोल्ड, सिस्त्रा, स्टुडिओ पीओडी अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांना सहभागी करून घेतले जात आहे. नियोजन, वास्तुरचना, अभियांत्रिकी, नगर आराखडा या क्षेत्रात या संस्था जगद्विख्यात आहेत. राहण्यायोग्य परिसर उभारणी करताना, दर्जा आणि शाश्वतता यांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हा यामागील उद्देश आहे.

मानवी संवेदनायुक्त तंत्रज्ञान

धारावीच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात असतानाही, निर्णयप्रक्रियेच्या केंद्रस्थानी नागरिक असतील याची काळजी घेतली जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत धारावीच्या सर्वंकष डिजिटल प्रतिकृतीची (Digital Twin of Dharavi) निर्मिती केली जात आहे. यामुळे नियोजनकार, अभियंते आणि सरकारी यंत्रणांना साकार स्वरूपात विकासावर देखरेख, सुविधा उभारणीत समन्वय, आव्हानांचा अंदाज आणि परिणामकारक निर्णयक्षमता प्रकल्प प्रत्यक्ष सुरू असताना साधू शकेल. 'धारावी दिदी'सारख्या एआय सहायकाच्या माध्यमातून रहिवाशांना त्यांच्या पसंतीच्या भाषेतून प्रकल्पाविषयी सत्यापित माहिती उपलब्ध केली जात आहे. अफवा किंवा तथ्यहीन माहितीवर विसंबून राहण्यापेक्षा सर्वेक्षण, पात्रता, पुनर्वसन आणि इतर पैलूंविषयी धारावीकरांचे शंकासमाधान या विश्वासू माध्यमातून सुरू झाले आहे. अशा उपक्रमांमुळे धारावी पुनर्विकास प्रकल्प अधिक स्मार्ट बनतोच, शिवाय पारदर्शी, सुलभ आणि लोकभिमुखही ठरतो आहे.

हरित-नील शहरी ओअॅसिस

प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश धारावीतील निसर्गसंपदेचे पुनरुज्जीवन हा आहे. धारावीतच मिठी नदी पुनरुज्जीवनाच्या बरोबरीने ४० हजार झाडांचे रोपण आणि संवर्धन करण्याची योजना आहे. धारावीच्या बाहेर मुंबई महानगर क्षेत्रात जवळपास दोन लाख झाडांची लागवड आणि मशागत करण्याचे आश्वासन एएनडीपीएलने दिले आहे. यामुळे या भागाचे हरित आच्छादन बळकट होईल. मिठी नदीचे पुनरुज्जीवन आंतरराष्ट्रीय प्रमाणीकृत जलसंवेदनशील शहरी नियोजनाच्या तत्त्वांवर केले जात आहे. नगर नियोजनाच्या मुळाशी स्वच्छ जलप्रवाह असले पाहिजेत, यावर अशा नियोजनात भर दिला जातो. यामुळे परिसंस्था विकासाबरोबरच पूरनियंत्रण शक्य होते, पर्यावरणाच्या दर्जात सुधारणा होते आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी शहरे अधिक क्षमतेने सिद्ध होतात. पुनरुज्जीवित मिठी नदी आणि विस्तारित हरित आच्छादनामुळे अधिक हरित, अधिक स्वच्छ आणि अधिक तंदुरुस्त धारावीची निर्मिती होण्यास मदत होईल. आमची वचनबद्धता केवळ नवी घरे बांधण्यापुरती सीमित नाही; तर जीवनमान सुधारणा, वस्त्यांचे सक्षमीकरण आणि भावी पिढ्यांसाठी अधिक चांगल्या पर्यावरणनिर्मितीसाठीदेखील आहे.

पुनर्वसन सदनिका बांधकाम

पुनर्विकास सदनिका बांधकामाला वेग येत आहे. रेल्वेच्या जमिनीवरील पुनर्वसन इमारतींचे काम वेळापत्रकानुसार प्रगतीपथावर आहे. येथील पुनर्वसन इमारत सन २०२८च्या अखेरीस हस्तांतरित केली जाणे अपेक्षित आहे.

पावसाळ्यानंतर लगेच रेल्वेच्या जमिनीवरील जवळपास १० हजार कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी इमारतींचे बांधकाम सुरू होईल. प्रत्येक टप्प्याच्या पूर्ततेतून रहिवासी सुरक्षित, आधुनिक घराच्या आणि प्रतिष्ठेच्या दिशेने एकेक पायरी पुढे सरकत आहेत.

बहुआयामी प्रगती

पावसाळ्यानंतर कामाचा वेग वाढावा यासाठी अनेक सरकारी विभाग एकत्रितपणे अडथळे दूर करण्याचे काम करत आहेत. धारावी बस आगाराची जमीन धारावी पुनर्वसनासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. धारावीमध्ये दोन आगारे विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. बांधकामाला गती मिळावी यासाठी मुलुंड येथे मोठा प्रीकास्ट कास्टिंग यार्ड प्रकल्पाचा प्रस्ताव विचाराधीन आहे. गेल्या वर्षभरात अतिरिक्त भूखंड अधिग्रहण, रेल्वे पुनर्वसनाला चालना, शिक्षण सातत्य नियोजन, धार्मिक स्थळांबाबत सल्लामसलती, सरकारी विभागांमधील समन्वयात सुधारणा अशा अनेक आघाड्यांवर प्रगती झालेली दिसते. हे केवळ प्रशासकीय पल्ले नाहीत, तर एका अत्यंत व्यामिश्र आणि अभूतपूर्व अशा नागरी पुनरुज्जीवन प्रकल्पाची ती पायाभरणी ठरते.

या स्वातंत्र्यदिनी आपण केवळ देशाचे यश साजरे करत नाही, तर अधिक उज्ज्वल भविष्याप्रति आपल्या सामूहिक जबाबदारीचे भानही जागवतो. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित निवारा, उत्तम सार्वजनिक अवकाश, विश्वासार्ह पायाभूत सुविधा, नवीन संधी सुनिश्चित केल्या जात आहेत. हे करत असताना धारावीतील पारंपरिक सामुदायिक बंधांना बाधा पोहोचणार नाही हेही पाहिले जात आहे.

अजून खूप काही करायचे बाकी आहे. पण दिशा निश्चित आहे. धारावीकरांच्या सततच्या विश्वासातून हा प्रयास वेग घेत आहे. किती इमारती बांधल्या यातून नव्हे, तर किती जणांच्या जीवनात प्रतिष्ठेच्या माध्यमातून परिवर्तन घडून आले, यावरच येत्या काही वर्षांमध्ये या प्रकल्पाचे यश मोजले जाईल.

(मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी, धारावी पुनर्विकास प्रकल्प / झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण)

Mumbai : मध्य रेल्वेवर आजपासून १५ डब्यांच्या आणखी २२ लोकल धावणार; अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, खोपोलीतील प्रवाशांना दिलासा

धारावीचा पुनर्विकास सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना द्या खास मराठी देशभक्तीपर संदेश; सोशल मीडियावर शेअर करा आकर्षक HD कार्ड्स

स्वातंत्र्यदिनासाठी तुमचाही फोटो बनवा खास; AI ला द्या हे ५ भन्नाट Prompt, एका क्लिकमध्ये मिळेल तिरंगा लूक!

आजचे राशिभविष्य, १५ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत