मुंबई : सततच्या इंधन, गॅस दरवाढीने सर्वसामान्यांचा रोजचा आहार महागला असताना गेल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मात्र होऊ दे खर्च अशी भूमिका सामान्य प्रशासन विभागाने घेतलेली दिसते. गेल्या अडीच वर्षांमध्ये या बंगल्यांवर येणाऱ्या पाहुण्यांच्या खातीरदारीवर तब्बल २१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शासकीय खानपानावर तब्बल १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला आहे. हा खर्च मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानातील खर्चापेक्षा दुप्पट आहे.
सामान्य प्रशासन विभागाने गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या मुंबईतील शासकीय निवासस्थानी येणाऱ्या अभ्यागतांचे, पाहुण्यांचे स्वागत, आदरातिथ्य करण्यासाठी सुखसागर हॉस्पिटॅलिटी सर्विसेस या सेवा पुरवठादाराची चार वर्षासाठी निवड केली आहे. त्यासाठी दरवर्षी ९ कोटी ८५ लाख तर पुढील चार वर्षात जवळपास ४० कोटी रुपये खर्च होणार आहे.
या पार्श्वभूमीवर सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी खानपान सेवेवर झालेल्या खर्चाबाबत माहितीच्या अधिकारात सामान्य प्रशासन विभागाने दिलेली खर्चाची आकडेवारी डोळे पांढरे करणारी आहे. मुंबई शिवाय नागपूर येथील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी तसेच दिल्लीतील महाराष्ट्र सदनात चहापान, अल्पोहारावर लाखो रुपयांचा खर्च झाला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात म्हणजे १ डिसेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२४ या दरम्यान ‘वर्षा’वर भेटीगाठी आलेले मंत्री, खासदार, आमदार, पाहुणे आणि कार्यकर्त्यांचे चांगलेच आगतस्वागत झाल्याचे खानपानाच्या देयकांवरून दिसते. या काळात खानपानापोटी सरकारने तब्बल ५ कोटी ६६ लाख ४२ हजार रुपयांची देयके अदा केली आहेत. ५ डिसेंबर २०२४ रोजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे यांचा मुक्काम ‘नंदनवन’वर हलला. तेथेही पाहुण्यांची सरबराई करण्यात त्यांच्या कार्यालयाकडून कोणतीही कसूर ठेवली गेली नाही. जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या १२ महिन्यात ‘नंदनवन’च्या खानपानावर जवळपास पाच कोटी रुपये खर्च झाला आहे. तर जानेवारी २०२६ ते एप्रिल २०२६ या चार महिन्यांचा ‘नंदनवन’चा चहा, नाश्ता, भोजनाचा खर्च पावणेदोन कोटी रुपयांच्या घरात गेला आहे.
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी राहत होते. डिसेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२४ या ११ महिन्यांच्या कालावधीत ‘सागर’वर येणाऱ्या पाहुण्यांच्या आदरातिथ्यावर २ कोटी २८ लाख रुपयांहून अधिक खर्च झाल्याचे उपलब्ध कागदपत्रांतून स्पष्ट होते. तर जुलै २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या दरम्यान ‘वर्षा’वरील खानपानाचा खर्च २ कोटी ३४ लाख रुपयांपर्यंत गेला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी जुलै २०२३ ते डिसेंबर २०२४ या दरम्यान खानपानावर १ कोटी ६८ लाख तर जानेवारी २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीत ७५ लाख ४० हजार रुपये इतका खर्च झाला आहे.
नागपूर निवासस्थानी खर्च (डिसेंबर २०२४ पासूनचा)
मुख्यमंत्री, रामगिरी: ६६ लाख ३७ हजार रुपये
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवगिरी: ४५ लाख ९५ हजार रुपये
उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयगड : १९ लाख ५१ हजार रुपये
महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली : १ लाख ३४ हजार २२ रुपये
‘वर्षा’वर एक महिन्यात ३३ लाखांचा खर्च
राज्यात २०२४ च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ६ डिसेंबर २०२४ ते ११ डिसेंबर २०२४ या दरम्यान शिंदे यांचे वास्तव्य ‘वर्षा’वर होते. त्यानंतर ‘वर्षा’च्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. तरीही सामान्य प्रशासन विभागाने डिसेंबर २०२४ या एका महिन्याचे शासकीय खानपानाचे तब्बल ३३ लाख ८१ हजार रुपयांचे देयक अदा केले आहे. त्यामुळे ‘वर्षा’वर नेमका कुणी पाहुणचार घेतला, असा प्रश्न केला जात आहे.