Mumbai : विसर्जन स्थळी समुद्रात ‘सेफ्टी सिग्नल’; खोलवर जाणाऱ्या भाविकांना ओहोटी रेषा दर्शवणारी तरंगती चिन्हे प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : विसर्जन स्थळी समुद्रात ‘सेफ्टी सिग्नल’; खोलवर जाणाऱ्या भाविकांना ओहोटी रेषा दर्शवणारी तरंगती चिन्हे

गणेशमूर्ती विसर्जनावेळी समुद्रात खोलवर जाणाऱ्या भाविकांना सुरक्षित अंतराची जाणीव व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

Swapnil S

मुंबई : गणेशमूर्ती विसर्जनावेळी समुद्रात खोलवर जाणाऱ्या भाविकांना सुरक्षित अंतराची जाणीव व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबईतील २१ संवेदनशील समुद्र विसर्जनस्थळी ओहोटीची रेषा दर्शविणारी ‘मरीन नेव्हिगेशन बॉयज’ अर्थात तरंगती मार्गदर्शक चिन्हे बसविण्यात येणार आहेत. ही चिन्हे रात्रीही स्पष्ट दिसण्यासाठी सौर दिवे बसविण्यात येणार असून, समुद्राच्या लाटांमुळे ती वाहून जाऊ नयेत यासाठी मुरिंग यंत्रणेच्या माध्यमातून समुद्रतळाशी स्थिर करण्यात येणार आहेत. यासाठी २ कोटी २२ लाखांचा खर्च अपेक्षित असून बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

मुंबईत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व माघी गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर मूर्तींचे समुद्रात विसर्जन केले जाते. विसर्जनाच्या वेळी भाविकांची होणारी प्रचंड गर्दी, समुद्राच्या लाटा आणि पाण्याची खोली यामुळे दुर्घटनांचा धोका निर्माण होतो. हा धोका कमी करण्यासाठी तरंगती मार्गदर्शक चिन्हे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

उत्सवानंतर चिन्हे हटविणार

ही सुरक्षा यंत्रणा कायमस्वरूपी नसून तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे. गणेशमूर्ती विसर्जनाचा कालावधी संपल्यानंतर तरंगती चिन्हे समुद्रातून काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येतील. पुढील गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि माघी गणेशोत्सवाच्या काळात पुन्हा ती संबंधित विसर्जनस्थळी बसविण्यात येणार आहेत.

सुरक्षिततेसह पर्यावरणीय नियमांच्या पालनावर भर

मुंबई उच्च न्यायालयाच्या २०२४ मधील निर्देशांनुसार आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मूर्ती विसर्जनासंदर्भातील सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, समुद्रातील ओहोटीची रेषा आणि भरतीची रेषा यांच्यामधील नॉन-इको सेन्सिटिव्ह क्षेत्रातच मूर्ती विसर्जन करण्याच्या कार्यवाहीला पालिकेने सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदाच्या विसर्जनात सुरक्षिततेसोबत पर्यावरणीय नियमांचे पालन करण्यावरही भर राहणार आहे.

२१ ठिकाणे संवेदनशील

मुंबईत एकूण ४३ ठिकाणी समुद्रात मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यापैकी संवेदनशील असलेल्या २१ ठिकाणी ही तरंगती सुरक्षा चिन्हे बसविण्यात येणार आहेत. गिरगाव चौपाटीवर प्रायोगिक तत्त्वावर या यंत्रणेचा वापर करण्यात आला असून, तो यशस्वी ठरल्याचा पालिकेचा दावा आहे. ही तरंगती चिन्हे भाविकांना समुद्रात धोकादायकरीत्या खोलवर जाण्यापासून रोखण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. तसेच विसर्जनाच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या पालिका कर्मचारी, जीवरक्षक आणि इतर सुरक्षा यंत्रणांनाही त्याचा फायदा होणार आहे.

रात्रीही दिसणार ‘सेफ्टी सिग्नल’

विसर्जनाच्या वेळी रात्रीच्या सत्रातही ही चिन्हे स्पष्टपणे दिसावीत यासाठी त्यावर सौरऊर्जेवर चालणारे दिवे बसविण्यात येणार आहेत. समुद्रातील जोरदार लाटा आणि प्रवाह यामुळे ही चिन्हे त्यांच्या मूळ जागेवरून अन्यत्र वाहून जाऊ नयेत, यासाठी मूरिंग यंत्रणेच्या सहाय्याने ती समुद्राच्या तळाशी दोरीने घट्ट बांधण्यात येणार आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचे देवेंद्र फडणवीसांनी केले कौतुक; अन्न भेसळीविरोधात धडक कारवाई सुरू ठेवण्याची दिली ग्वाही

राहुल गांधींची सभा रोखण्यासाठी पुण्यात जमावबंदीचे आदेश; काँग्रेसचा आरोप

उच्चस्तरीय समिती स्थापण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; दिल्ली विद्यार्थी आंदोलनातील पोलिसांच्या अतिरेकाची चौकशी

राम मंदिर देणगी चोरी प्रकरण : चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना SIT कडून ‘क्लीनचिट’

पंढरपूरसाठी पुनर्वसन धोरण; जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ६,४७७ कोटींची तरतूद, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले मोठे निर्णय